Monsoon Travel : रिमझिम पाऊस.. तन-मन ओलेचिंब.. कमी गर्दीत निसर्गसुख अनुभवायचंय? पुण्याजवळची 'ही' ठिकाणं फार कमी लोकांना माहिती
Travel : महाराष्ट्रही निसर्गसौंदर्याच्या बाबतीत कमी नाही.. अशी काही ठिकाणं पुण्यात आहेत. जिथे तुम्हाला कमी गर्दी मिळेल, जेणेकरून तुम्ही निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊ शकाल..
Travel : पाऊस म्हटला की हिरवा निसर्ग... पाऊस म्हटला की तन-मन ओलेचिंब... पाऊस म्हटला की अंगावर येणारे शहारे..पाऊस म्हटला की मनात-ओठावर पावसाची गाणी... पाऊस म्हटला की पक्ष्यांचा किलबिलाट... या पावसामुळे महाराष्ट्रातील निसर्ग अगदी बहरून गेलाय. पृथ्वीने जणू काही हिरवा शालू नेसला आहे. ज्यामुळे चोहीकडे हिरवळ... हवेत गारवा..आणि विचारांचा कल्लोळ बाजूला ठेवत एक शांततेची अनुभूती या मनाला लाभते. निसर्गप्रेमी पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्हाला फक्त पावसाळ्यातच सुंदर नजारे पाहायला मिळतील. मात्र महाराष्ट्रही निसर्गसौंदर्याच्या बाबतीत कमी नाही.. अशी काही ठिकाणं पुण्यात आहेत. जिथे तुम्हाला कमी गर्दी मिळेल, जेणेकरून तुम्ही निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊ शकाल..
पुण्यातील 'अशी' काही ठिकाणं, जिथे तुम्ही निसर्गसुख अनुभवू शकाल
मान्सून आला की सोबत आल्हाददायक वातावरण घेऊन येतो. अशा वातावरणात कोणाला फिरायला आवडणार नाही. यामुळे मुंबई-पुणेपासून जवळ राहणाऱ्या लोकांची सध्या पुण्यातील प्रसिद्ध ठिकाणांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वाढणाऱ्या गर्दीमुळे लोक कुठेही प्रवास करणे टाळत आहेत. अनेकदा जोडप्यांना अशा ठिकाणी जायला आवडते, जिथे त्यांना शांतता अनुभवता येईल. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला पुण्यातील अशाच काही लपलेल्या ठिकाणांची सविस्तर माहिती देणार आहोत.
शिरोटा तलाव
हा तलाव पुण्यातील कमी गर्दीचे ठिकाण आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हा तलाव शहराच्या सीमेवर आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची गर्दी खूपच कमी आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हा तलाव पाहायला नक्की या. येथे तुम्ही आजूबाजूच्या भागात ट्रेकिंग देखील करू शकता, परंतु तुम्ही पावसाळ्यात ते करणे टाळावे. पावसाळ्यात तुम्ही इथे लांबच्या रोड ट्रिपला जाऊ शकता.
पुण्यापासून या तलावाचे अंतर 74 किमी आहे.
विसापूर किल्ला
हिरवाईने वेढलेला हा किल्ला खंडाळ्याच्या सुंदर डोंगरांत आहे. पावसाळ्यात हा किल्ला आणखीनच आकर्षक बनतो. या ठिकाणाची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागेल, मात्र तुम्हाला इथे जास्त गर्दी दिसणार नाही. हा किल्ला विसापूर गावात आहे. इथे पायऱ्यांवर पडणारे पावसाचे पाणी खूप सुंदर दिसते. पावसाळ्यात भेट देण्यासारखे हे सर्वात सुंदर ठिकाण आहे.
पुण्यापासून अंतर - 75 किमी.
View this post on Instagram
घनगड किल्ला
पावसाळ्यात तुम्ही इथे कॅम्पिंगला जाऊ शकता. येथे तुम्ही 'गर्जाई' देवीचे मंदिर, किल्ले, लेणी अशा काही ठिकाणी भेट देऊ शकता. जर तुम्ही लोणावळा-खंडाळा येथून येत असाल तर तुम्हाला 30 किमी आणि पुण्यापासून 100 किमी अंतर पार करावे लागेल. हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे.
हेही वाचा>>>
Monsoon Travel : आयुष्यात एकदा तरी पावसाळ्यात 'या' 5 रेल्वे मार्गांवर प्रवास कराच..! हा अनुभव स्वर्गसुखापेक्षा कमी ठरणार नाही
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )