Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचं थैमान! सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद, जनजीवन विस्कळीत
Maharashtra Weather Update : मराठवाड्यात पावसाने सर्वत्र एकच हाहा:कार केल्याचे चित्र आहे.अशातच आता सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाल्यानंतर सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : मराठवाड्यात पावसाने (Rain Update) सर्वत्र एकच हाहा:कार केल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीने कधी नव्हे ते मराठवाड्यातील (Marathwada Rain) शेकडो गावांना अक्षरशः झोडपून काढलं आहे. दरम्यान अद्यापही पावसाने आपला जोर कायम ठेवला असल्याने संकाटाचे काळे ढग अद्याप ओसरले नसल्याचे चित्र आहे, अशातच आता पावसामुळे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक लांबोटी येथे पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाल्यानंतर सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. रात्री 11 वाजल्यापासून दोन्ही बाजूने वाहतूक बंद झाल्याने वाहनांच्या लांबचं लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक देखील बंद करण्यात आल्याची माहिती आहे. उत्तर सोलापुरातील तिऱ्हे गावाजवळ सीना नदीच्या पुलावर देखील वाहतूक बंद करण्यात आलीय. सीना नदीचा प्रवाह कमी होईपर्यंत वाहतूक बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी अनेक गावांचा आता संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात असून या वाहतूक बंद मुळे विविध दैनिकांची वाहतूक करणाऱ्या गाड्या ही पहाटेपासून थांबून आहेत.
रेल्वे मार्गवरील वाहतूक ही प्रभावीत
अशातच, सोलापूर रेल्वे विभागातील सीना नदीवरील दोन रेल्वे पूल ओलांड्यांमध्ये पाण्याची पातळी धोक्याच्या सीमारेषेवर पोहोचली आहे. सुरक्षित रेल्वे वाहतुकीसाठी या मार्गांवरील सर्व रेल्वे गाड्यांचा वेग ३० किमी प्रतितास इतका कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. करमाळा तालुक्यातील मुंडेवाडी जवळ सीना नदीचे पाणी रेल्वे पुलाजवळ पोहोचलय. दरम्यान दौंड-वाडी हा मार्ग राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कमधील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या भागातील पाण्याचे नियमन करण्याची विनंती मध्ये रेल्वेच्या सोलापूर वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. एकंदरीत रस्ते मार्गनंतर आता रेल्वे मार्गवरील वाहतूक ही प्रभावीत झाल्याचे चित्र आहे.
भीषण परिस्थितीमुळे "डोळ्यातला पाऊस थांबत नाहीये"
मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरं आणि शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या भीषण परिस्थितीमुळे "डोळ्यातला पाऊस थांबत नाहीये". सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे. माढा तालुक्यातील सोळा गावांना सीना नदीच्या पाण्याने वेढा दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कळंब तालुक्यात मांजरा नदीला पूर आला आहे. नदीच्या पुरामुळे आजूबाजूच्या शेतात पाणी शिरले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जालन्यातील बदनापूर आणि अंबड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या दोन तालुक्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या सुखना नदीलाही पूर आला आहे. वाकुळणी आणि माहेर भायगाव परिसरातून वाहणाऱ्या सुखना नदीचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आणखी वाचा
























