बीडमध्ये फेसबुक फ्रेंडच्या जाचास कंटाळून तरुणाची आत्महत्या
दीपक अविवाहित होता तो स्वतः ट्रक चालवायचा आणि त्यावर त्याचे घर चालायचे. मात्र अचानक दीपकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्याच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला.
बीड : बीडच्या धारूरमधील कासारी या गावी दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणाचे फेसबुकवर एका महिलेशी झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर महिलेने तरुणाला लग्नासाठी गळ घालत जमीन व ट्रक नावावर कर म्हणून तगादा लावला. या जाचाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी एक महिला आणि त्या तरुणाच्या मित्रावर ती गुन्हा दाखल झाला आहे.
दीपक सुभाष सांगळे हे आत्महत्या केलेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. 4 तारखेला रात्री धारुर शहराजवळील एका शेतातील झाडाला दीपकचा मृतदेह दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. रात्री या शेतामध्ये फार कोणाचा वावर नसायचा त्यामुळे ही भाग 5 तारखेला सकाळी उघडकीस आली.
दीपक अविवाहित होता तो स्वतः ट्रक चालवायचा आणि त्यावर त्याचे घर चालायचे. मात्र अचानक दीपकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्याच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला. दीपकच्या आत्महत्येनंतर त्याची बहीण शीतल घुगे हिने दीपकचा मोबाईल तपासला आणि मोबाईलमधील माहितीच्या आधारे तिने धारूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
या तक्रारीमध्ये शितल घुगे यांनी पुण्यामधल्या एका विवाहित महिलेसोबत दीपकची फेसबुकवर ओळख झाल्याचे म्हटले आहे. या ओळखीचा फायदा घेत संबधित महिलेने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर माझ्याशी लग्न कर, शेती व ट्रक नावावर कर' असं म्हणून तिने त्यास मानसिक त्रास दिला. तिच्या सततच्या त्रासास कंटाळून दीपकने आत्महत्येचे पाऊल उचलले. आरती असं या महिलेचं नाव आहे. मयत दीपकचा मोबाइल क्रमांक उपलब्ध करुन दिल्याने त्याचा मित्र ज्ञानेश्वर उर्फ वाघ्या बाबासाहेब मुर्गीकर यालाही गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले.
दरम्यान दीपकच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुण्यामधल्या विवाहित महिलेचा संदर्भात माहिती गोळा करणे सुरू आहे. नेमके कोणत्या कारणामुळे दीपकने आत्महत्या केली हे या तपासानंतरच कळणार आहे.