Yavatmal News : चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला तिहेरी जन्मठेप, 42 दिवसांत दिला निकाल
Yavatmal News : यवतमाळमध्ये 13 मार्च 2022 रोजी संजय उर्फ मुक्या जाधव याने सहा वर्षाच्या मुलीवर घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केला होता.
Yavatmal News Update : सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तिहेरी जन्मठेपेठी शिक्षा सुनावली आहे. 15 मार्च 2022 रोजी आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दारव्हा जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाने आरोपीला तिहेरी जन्मठेप आणि पंधरा हजार रूपये दंडांची शिक्षा सुनावली आहे. संजय उर्फ मुक्या जाधव (वय 24, रा. बोरगाव, ता. आर्णी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी 12 साक्षीदार तपासण्यात आले आहे. या बाराही साक्षीदारांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या.
आरोपीला कलम 376(AB) (जन्मठेप, पाच हजार रूपये दंड), बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत (जन्मठेप, पाच हजार रूपये दंड) आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा (जन्मठेप, पाच हजार रूपये दंड ) अशी तिहेरी जन्नठेपेची शिक्षा सुनावली आहे.
42 दिवसांत निकाल
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर केवळ 42 दिवसांत दारव्हा जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. एवढ्या कमी कालावधीत निकाल देण्याची यवतमाळ जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ असून दारव्हा जिल्हा व अप्पर न्यायालयाचे न्यायाधीश एच.एल.मनवर यांनी हा निकाल दिला आहे.
काय आहे प्रकरण?
यवतमाळमध्ये 13 मार्च 2022 रोजी संजय उर्फ मुक्या जाधव याने सहा वर्षाच्या मुलीवर घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केला होता. पीडित मुलीची आई घरी आल्यानंतर तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसले. शिवाय पीडित मुलगी रडत होती. त्यामुळे आईने तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने याबाबत माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलगी आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणी अहवालात पीडिताचे रक्त आरोपीच्या कपड्यावर आढळून आले. साक्षीपुरावे, वैद्यकीय अहवाल, डीएनए रिपोर्ट अशा पुराव्यावरून आरोपीने अत्याचार केल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर 42 दिवसांनी न्यायालयाने संजय उर्फ मुक्या जाधव याला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.