माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास
माजी आमदार राजू तोडसाम यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे राजू तोडसाम यांची रवानगी यवतमाळ कारागृहात करण्यात आली आहे.

यवतमाळ : यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांच्या कारावासाचा शिक्षा झाली असून त्यांची रवानगी यवतमाळ कारागृहात करण्यात आली आहे. 2013 मध्ये पांढरकवडा इथल्या महावितरण कार्यालयातील लेखापालाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने 2015 साली राजू तोडसाम यांना सुनावलेली तीन महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. त्यानंतर राजू तोडसाम यांची रवानगी यवतमाळ कारागृहात करण्यात आली.
काही लोकांचं वाढीव बिल कमी करण्यासाठी 17 डिसेंबर 2013 रोजी राजू तोडसाम आपल्या समर्थकांसह पांढरकवडा इथल्या वीज वितरण कार्यालयात गेले होते. यावेळी तिथल्या लेखापालाशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. दोघांमध्ये वाद वाढला. यानंतर राजू तोडसाम यांनी आपल्याला शिवीगाळ करुन मारहाण केली, अशी तक्रार लेखापालने पोलिसात दाखल केली होती. याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता
शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने राजू तोडसाम तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि आणि 10 हजार रुपये दंड तसंच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा कारावास अशी शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेला राजू तोडसाम यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. या प्रकरणी तीन वर्षांनी गुरुवारी (21 जानेवारी) अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी कानिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. त्यानंतर माजी आमदार राजू तोडसाम यांची यवतमाळ कारागृहात रवानगी केली.























