ह्रदयस्पर्शी... ''माझी आई मला परत करा, ती कधी येईल?''; वरळी हिट अँड रन दुर्घनटेतील मृत कावेरी यांच्या लेंकीची आर्त हाक
वरळी हीट अँड रन प्रकरणात शिवसेना उपनेत्याच्या बड्या बापाच्या लेकानं, त्याच्या बड्या कारने दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या जोडप्याला उडवलं
मुंबई : राजधानी मुंबईच्या वरळी हिट अँड (Worli Hit and Run) रन प्रकरणात पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शाह यालाही पोलिसांनी शहापूर येथील एका फ्लॅटमधून अटक केली आहे. या अगोदर मिहीरचे वडील, आई आणि बहिणीसह या प्रकरणात शाह कुटुंबीयांना मदत करणाऱ्या 12 जणांना आत्तापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, पीडित नाखवा कुटुंबीयांवर कोसळलेल्या दु:खाची भरपाई कशानेही होणार नाही. नुकतेच, अपघातामधील (Accident) मृत कावेरी नाखवा यांच्या मुलीचा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती मुलगी स्वत:चे अश्रू रोखू शकत नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे माझ्या आईला मी रडलेलं आवडणार नाही, असे म्हणत ती धाय मोकलून रडताना दिसत आहे. तसेच, माझी आई मला परत करा, अशी आर्त हाक तिने दिल्याचं दिसून येत आहे.
वरळी हीट अँड रन प्रकरणात शिवसेना उपनेत्याच्या बड्या बापाच्या लेकानं, त्याच्या बड्या कारने दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या जोडप्याला उडवलं. दारुच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवून मिहीर शाह याने एका निष्पाप महिलेचा बळी घेतला. या घटनेनंतर तो फरार झाला होता, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात राजेश शाह यांनी अपघात झालेल्या गाडीवरील पक्षाचा झेंडा आणि नंबरप्लेट बदलण्याचा प्रयत्न केल्याचं प्रकरणही समोर आलं. तसेच, ही गाडी मुख्य पुरावा असून ती अज्ञात स्थळी लपवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. त्याचसोबत मिहीर शाहाने अपघात झाल्याची माहिती राजेश शाहांना फोनवरून दिल्यानंतर 'तू पळून जा, अपघात ड्रायव्हरने केल्याचं आपण सांगू' असा सल्ला त्याच्या वडिलांनी दिल्याचं पोलिस तपासातून समोर आलं आहे. त्यामुळे, पोलिसांनी आरोपी मिहीर शाह याच्या वडिलांनाही अटक केली आहे. मात्र, पीडित कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कावेरी यांचे पती प्रदीप आणि त्यांच्या मुलीच्या डोळ्यातील अश्रू थांबता थाबेना झाले आहेत. कावेरी यांची मुलगी पीटीआय या वृत्तावाहिनीशी बोलताना धाय मोकलून रडत असल्याचे दिसून येते.
''मी रडलेलं माझ्या आईला चांगलं वाटत नाही, पण मी प्रयत्न करुनही डोळ्यातील अश्रू रोखू शकत नाही, असे म्हणत मृत कावेरी नाखवा यांच्या मुलीने डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. माझी आई माझं सर्वस्व होती, मला माझी आई परत हवीय,माझी आई कधी परत येईल?,'' अशी भावनिक आर्त हात मृत कावेरी यांच्या मुलीने दिली असून मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत
वरळीतल्या हिट & रन केसमधील हा 👇🏻 व्हिडीओ पुढे येऊ नये म्हणुन अंबानीच्या लग्नातले व्हिडीओ टाकले जाताहेत. भ्रजपाच्या औलादी किती संवेदनाहीन आणि राक्षसी मनोवृत्तीच्या असतील याचा अंदाज येतोय. माझी आई मला परत करा ही आर्त किंकाळी दाबुन टाकण्यासाठी इतर संगीत. छी.pic.twitter.com/cTtq6Lt1wF
— Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी (@jayeshwani) July 9, 2024
प्रदीप नाखवा यांचाही संताप
प्रशासन केवळ श्रीमंतांचं आहे, या जगात गरिबांना कुणीच वाली नाही, फक्त श्रीमंत लोकांचंच ऐकलं जातं. सगळं राजकारण चालतंय, असे म्हणत घडलेल्या घटनेवरुन मृत कावेरी यांचे पती प्रदीप नाखवा यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रदीप नाखवा हेही गेल्या दोन दिवसांपासून पत्नीच्या विरहाने माध्यमांसमोरच डोळ्यातील अश्रू ढाळत आपलं दु:ख व्यक्त करत आहे.