एक्स्प्लोर
भगवानगड दसरा मेळाव्याबाबत पंकजा मुंडे अजूनही संभ्रमात!
गेल्यावर्षीप्रमाणे महंत नामदेव शास्त्रींनी यंदाही दसरा मेळाव्याला पंकजा मुंडेंना गडावर सभा घेण्यास मनाई केली आहे.
बीड : भगवानगड दसरा मेळाव्याच्या वाद गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कायम आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचे समर्थक आणि गडाचे मठाधिपती महंत नामदेव शास्त्री यानिमित्ताने आमनेसामने आले आहेत.
भगवानगड दसरा मेळाव्याबाबत संभ्रमावस्थेत असल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी भक्त आणि कार्यकर्त्यांच्या भावनांना हात घातला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे महंत नामदेव शास्त्रींनी यंदाही दसरा मेळाव्याला पंकजा मुंडेंना गडावर सभा घेण्यास मनाई केली आहे.
त्यामुळे पंकजा मुंडे संभ्रमावस्थेत असल्याचं सांगत असल्या तरी यानिमित्ताने त्यांनी वंजारी समाजाच्या मनाची चाचपणी सावधपणे सुरु केली आहे.
पंकजा मुंडेंना समाजाचं नेतृत्त्व न मिळण्यासाठी धडपड?
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंना भगवानगडाचा आशीर्वाद होता. शिवाय नामदेव शास्त्रींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पण गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडेंमध्ये वाद झाला आणि तो विकोपाला गेला. त्यामुळेच पंकजा मुंडेंना गडावरुन नेतृत्त्व करण्याची संधी मिळू नये, यासाठी धडपड सुरु आहे.
गेल्यावर्षी पंकजा मुंडेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. गडाच्या पायथ्याला सभा घेतली. यामुळे पंकजा मुंडेंना समाजाच्या नेतृत्वाची उंची मिळाली. यंदा कार्यकर्ते जोशात असून फक्त आदेशाची वाट पाहत आहेत.
गोपीनाथ मुंडे होते, तोवर भगवानगडाला राजसत्तेचं वावडं नव्हतं. आता धर्मसत्ता आणि राजसत्तेचा संघर्ष ताकदीसाठी आणि शक्तीसाठी सुरुय, हे स्पष्ट आहे.
भगवानगड दसरा मेळावा वाद काय आहे?
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळाव्यात समर्थकांना संबोधित करायचे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ही परंपरा त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी चालू ठेवली. मात्र गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर दसरा मेळावा यापुढे होणार नाही, अशी भूमिका गेल्या वर्षीपासून घेतली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेनंतर पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याशी समर्थकांना संबोधित केलं. यावर्षीही हा वाद कायम आहे.
एकीकडे मुंडे समर्थक दसरा मेळाव्यासाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे गडाचे महंत नामदेव शास्त्री त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. यावर्षी गडावर दसऱ्याला कोणत्याही व्हीव्हीआयपीला परवानगी देण्यात येऊ नये, असं पत्र नामदेव शास्त्रींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement