(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sawantwadi Dodamarg Constituency : सावंतवाडी - दोडामार्ग विधानसभा मतदारसंघात कुणाचं वर्चस्व? दिपक केसरकरांना कुणाचं आव्हान?
Sawantwadi Dodamarg Constituency : तळकोकणातील विधानसभा मतदारसंघ म्हणजे सावंतवाडी - दोडामार्ग विधानसभा मतदारसंघ. दिपक केसरकर यांच्या मतदारसंघात होणारी आगामी विधानसभेची निवडणूक चुरशीची असणार आहे.
Sawantwadi Dodamarg Constituency : तळकोकणातील आणि गोव्याच्या सीमेला लागून असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे सावंतवाडी - दोडामार्ग विधानसभा मतदारसंघ. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या दिपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) या ठिकाणी शिवसेनेकडून बाजी मारली. पण, सध्या दिपक केसरकर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात (Shinde Group) सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे गटाची बाजू प्रवक्ते म्हणून दिपक केसरकर जोरकसपणे मांडत असताना त्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना देखील टोले लगावत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील काही सवाल केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता तीन मतदारसंघापैकी दोन ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. पण, सध्या दिपक केसरकर शिंदे गटात आहेत. अशा वेळी 1 ऑगस्टपासून कोकण दौऱ्यावर येत असलेले आदित्य ठाकरे पहिल्यांदा सांवतवाडीमध्ये दाखल होणार आहेत.
या मतदारसंघाबाबत बोलताना दिपक केसरकर यांच्या ताकदीवर, त्यांच्या मतदारसंघातील प्रभावावर बोललं जातं. त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती दिपक केसरकर यांच्या बाजुनं आहे असं मानलं किंवा सांगितलं जातं. रम्यान, जाणकारांच्या मते इथली परिस्थिती मात्र वेगळी असणार आहे किंवा ती वेगळी असू शकते. कारण, या ठिकाणी होणारी लढत ही चुरशीची असणार आहे, असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्याबाबत देखील आम्ही या भागात वावरणाऱ्या आणि राजकीय स्थितीची जाण असलेल्या काही अभ्यासकांशी बोललो.
पहिल्यांदा आम्ही सकाळ वृत्तपत्राचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आवृत्तीप्रमुख शिवप्रसाद देसाई यांच्याशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला उमेदवार निवडीपासून सुरूवात करावी लागणार आहे. त्यामुळे ठिकाणी शिवसेनेचा उमेवार कोण? या प्रश्नापासून सुरूवात होते. पण, या मतदारसंघात मागील दोन विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष अधिक सक्षमपणे पुढे आलेला आहे. त्यामुळे शिवसेनेला पूर्ण क्षमतेनं लढत देण्याची ताकद सध्या भाजपमध्ये आहे. जर कदाचित दिपक केसरकर भाजपमध्ये गेल्यास त्या ठिकाणी होणारी लढत हि चांगली होऊ शकते. मधल्या काळात त्यांचा मतदारसंघात संपर्क नव्हता. त्यामुळे त्यांच्याबाबत नाराजीचा सूर देखील पाहायाला मिळतो. त्याचा फायदा शिवसेनेला मिळू शकतो. शिवसेनेनं सक्षम उमेदवार किंवा नवा चेहरा दिल्यास देखील या ठिकाणी केसरकरांना शिवसेनेकडून आव्हान उभं राहू शकते. दिपक केसरकर यांना आता कोणतं मंत्रीपद मिळणार आणि ते कसं काम करणार? यावर देखील साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस देखील या ठिकाणी तयारी करत आहे. मुळच्या सावंतवाडीच्या आणि सध्या पुण्यात राजकीय कारकीर्द असलेल्या अर्चना घारे गेली काही वर्षे सक्रीय आहेत. मागील सात ते आठ महिन्यापासून त्या जास्तप्रमाणात सक्रीय झालेल्या दिसून येतात. त्यामुळे तिसरी ताकद देखील या ठिकाणी उभी राहू शकते.' अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. यावेळी देसाई यांनी 'दिपक केसरकर हे लोकसभेसाठी इच्छूक असून ती आता दिसून येत आहे. दिल्लीच्या राजकारणात आपण फिट बसू शकतो असं दिपक केसरकर यांना वाटत असावं. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते भाजपकडून रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे देखील उमेदवार असू शकतात. निलेश राणे विधानसभेसाठी इच्छुक असल्यानं राणे कुटुंबातील लोकसभेसाठी कुणी नसणार आहे. केसरकर सध्या शिंदे गटात असून ते भाजपमध्ये जाणार का? या पुढच्या गोष्टींवर सारी गणितं अवलंबून असणार आहेत. या साऱ्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा 1 ऑगस्ट रोजी होणारा सावंतवाडी येथील दौरा कार्यकर्त्यांना ऊर्जा देणार नक्कीच असणार आहे. अर्थात त्याचा मतदारांवर परिणाम होईल असं नाही अशी माहिती देखील यावेळी शिवप्रसाद देसाई यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.
दरम्यान सिंधुदुर्गातील सावंतवाडी मतदासंघांचे आमदार दिपक केसरकर यांनी बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाल्याचा त्यांना फटका बसू शकतो. मात्र आगामी काळात ते विधानसभा निवडणूक न लढवता लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता सावंतवाडीमधील पुढारी वृत्तपत्राचे पत्रकार हरिश्चंद्र पवार यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केली आहे. सावंतवाडी मतदारसंघांत शिवसेनेचे मताधिक्य ठरलेलं असल्याने दिपक केसरकर यांना विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. मात्र, शिंदे गट आणि भाजप एकत्रित आल्यास नारायण राणेंच्या माध्यमातून फायदा होणार आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार? यावर गणित अवलंबून असणार असल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी हरिश्चंद्र पवार यांन 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे.
या जाणकारांसोबत बोलल्यानंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट होतेय की, दिपक केसरकर यांच्या मतदारसंघात होणारी आगामी विधानसभेची निवडणूक चुरशीची असणार आहे. पण, होणारी निवडणूक या ठिकाणी उमेदवार कोण असणार? यावर देखील अधिक अवलंबून असणार आहे.