बाबरीच्या वेळी शिवसेना कुठे होती? हे तुमच्याच पक्षातील नेत्यांना विचारा, राऊतांचा फडणवीसांना टोला
Shiv Sena MP Sanjay Raut : बाबरीच्या वेळी शिवसेना कुठे होती? हे तुमच्याच पक्षातील नेत्यांना विचारा, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागलं आहे.
Shiv Sena MP Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बाबरीच्या वेळी शिवसेना कुठे होती, हे तुमच्याच पक्षातील नेत्यांना विचारा, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तर भोंगे हा विषय नाहीये. भोग्यांपेक्षा महत्त्वाचे विषय देशात आहेत. या भोंग्यांना पॉवर कोणाची आहे, हे देशाला माहित आहे, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवरही टीकास्त्र लादलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "किती काळ तुम्ही बाबरी ढाच्यावर बोलणार आहात? महाराष्ट्रात आणि देशात महागाई आणि बेरोजगारीपासून असंख्य प्रश्न आहेत. पण महागाई, बेरोजगारी आणि चीननं केलेली घुसखोरी यावरुन लक्ष हटवण्यासाठी पुन्हा एकदा हनुमान चालिसा, बाबरी या विषयांवर भाजप आणि मित्रपक्ष या विषयांवर सातत्यानं बोलत आहेत. लोकांचे प्रश्न पाहा ना देशातील. बेरोजगारी किती वाढलीये? महागाईचा किती स्फोट झालाय? चीनच्या सीमेवर भारतात कशी घुसखोरी सुरु आहे? त्यांना दम द्या. विषय बाबरीचा असेल, जर कोणी म्हणत असतील, ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी शिवसेना कुठे होती? हे त्यांनी त्यांच्याच पक्षाचे तेव्हाचे नेते सुंदर सिंह भंडारी (Sunder Singh Bhandari) यांना जाऊन विचारावं, शिवसेना कुठे होती. त्यावेळीचा सीबीआयचा अहवाल तपासा. सीबीआयनं संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आहे. यातून शिवसेना कुठे आहे? असं विचारणाऱ्या अज्ञानी लोकांना कळेल शिवसेना कुठे होती. इतक्या वर्षांनी फुलबाजी उडवायला झालं काय? तो विषय संपलेला आहे. तरी का काढताय? राम मंदिर उभारलंय. वातावरण बदललंय, प्रश्न बदललेत. अशावेळी मूळ प्रश्नावरचं लक्ष दूर करण्यासाठी भाजप आणि त्यांचे छुपे साथीदार या विषयाकडे लोकांना आकर्षित करत आहेत."
भोंगे हा विषय नाहीये. भोग्यांपेक्षा महत्त्वाचे विषय देशात आहेत : संजय राऊत
मुख्यमंत्र्यांच्या लोकसत्तामधील मुलाखतीबाबत विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की, मला माहीत नाही, त्या मुलाखतीबाबत. लवकरच सामनामध्ये त्यांची मुलाखत येईल. राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "भोंगे हा विषय नाहीये. भोग्यांपेक्षा महत्त्वाचे विषय देशात आहेत. या भोंग्यांना पॉवर कोणाची आहे, हे देशाला माहित आहे. हे हिंदुत्त्व नाही. कायद्याच्या चौकटीतला विषय आहे. कायदा मोडणाऱ्यांवर काय करता येईल? हा सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, पोलीस यंत्रणांचा विषय आहे. तुम्हाला आता काहीच काम नसल्यानं तुम्ही या विषयावर बोलत असणार. तुम्ही महाराष्ट्राचं आणि देशाचं वातावरण खराब करताय. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी, हे राष्ट्रहिताचं नाही. ते राष्ट्राला मारक आहे. राष्ट्रीय एकात्मतेला मारक आहे. आम्ही स्वतः या मताचे आहोत की, भोंग्यांमुळे कोणाला त्रास होऊ नये. आम्ही याविरोधात आंदोलनं केली आहेत. लढाई केली आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं काही निर्णय दिले आहेत. या देशात कायद्याचं राज्य असेल, तर प्रत्येकानं कायद्याचं पालन केलं पाहिजे."
हे लेच्यापेचांचं राज्य नाही, राज ठाकरेंना राऊतांचा टोला
राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टीमेटमला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, "हे लेच्यापेचांचं राज्य नाही. इथे गृहखातं आहे, मुख्यमंत्री आहेत, सरकार आहे लोकनियुक्त. सरकारला माहीत आहे काय करायचंय ते." सध्याचं सरकार हे रामाच्या बाजूनं की, रावणाच्या बाजूनं हे कळत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला होता. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "हे ज्यांनी वक्तव्य केलंय, ते फार चुकीचं आहे. त्यांनी रावणाचाही इतिहास पाहिला पाहिजे. रावणाचा अंत हा अहंकारामुळे झाला. रावण विद्वान, हुशार योद्धा होता. पण तो धारातीर्थी पडला तो त्याच्या अहंकारामुळे. काही लोकांना सत्ता असल्याचा अहंकार असतो. तर काहींना सत्ता गमावल्यातूनही अहंकार येतो. आता नेमकं का कोण कोणाला रावण म्हणतंय, हे पाहावं लागेल. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारला आहे. त्यांनी त्या रावणाचा अंत करावा आणि मग राज्याच्या देशाच्या प्रश्नांवर बोलावं."