कोरोना स्थिती आणि लसीकरण : परदेशी लसींसाठी कच्चा माल पुरवणाऱ्या एकमेव भारतीय कंपनीच्या एमडींचं विश्लेषण काय?
सध्या रत्नागिरीतील व्हीएव्ही ही एकमेव भारतीय कंपनी अमेरिकेतील मॉडर्ना आणि फायझर लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवत आहे. देशासह जगातील कोरोना स्थिती, लसीकरण, पेटंट खुलं करणं यासारख्या विषयांवर कंपनीचे एमडी अरुण केडिया यांच्याशी साधलेला हा संवाद.
रत्नागिरी : देशातील कोरोना स्थिती, लसीकरण याबाबत सध्या विविध मतमतांतरं दिसून येतात. पण, आपल्या देशातील परिस्थिती सावरण्याकरता जगातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. काही विदेशी लसींना देखील आता परवानगी दिली जात आहे. असं असलं तरी सध्या एक भारतीय कंपनी अमेरिकेतील मॉडर्ना आणि फायझर लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवत आहे. जगातील चार कंपन्या यामध्ये असून व्हीएव्ही ही एकमेव भारतीय कंपनी आहे. मुख्य बाब म्हणजे सध्या रत्नागिरीमध्ये हा कच्चा माल तयार होत आहे. देशासह जगातील कोरोना स्थिती, लसीकरण, पेटंट खुलं करणं यासारख्या विषयांवर कंपनीचे एमडी अरुण केडिया यांच्याशी साधलेला हा संवाद.
प्रश्न : सध्या कोरोनासारख्या जागतिक संकटात व्हीएव्ही ही एकमेव भारतीय कंपनी अमेरिकेतील फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांना लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवत आहे. हा कच्चा माल नेमका काय आहे? या लस करण्यामध्ये त्याचं किती महत्त्व आहे?
उत्तर : मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि, व्हीएव्ही कंपनी एमआरएनए बेस लसीकरता लागणारा कच्चा माल पुरवत आहे. मॉर्डना आणि फायझर या कंपन्या एमआरएनए बेस लस तयार करत आहेत. भारतात तयार होत असलेल्या लसी या एमआरएनए बेस नाहीत. त्यामुळे त्यांना आम्ही कच्चा माल पुरवत नाहीत. या कच्च्या मालाचं नाव आहे, हायली फ्युरिफाय सिंथेटिक फॉस्फोलिपीड. या लसींचा एक भाग आरएनए, एमआरएनए असा असतो. तो मोठ्या प्रमाणात अस्थिर असतो. त्यांना लिपिडच्या एका कॅप्सूलमध्ये टाकावं लागतो. आरएनएला संरक्षण देण्यासारंखं महत्त्वाचं काम सिंथेटिक फॉस्फोलिपीड करतात. शिवाय, सिंथेटिक फॉस्फोलिपीड नसल्यास ही लस तयारच होऊ शकत नाही.
प्रश्न : एकंदरीत या दोन्ही अमेरिकन कंपन्यांना लसीकरणासाठी लागणारा कच्चा माल पुरवत असताना त्याची सुरुवात कशी झाली? ही प्रक्रिया कशी आहे? आणि सध्या किती प्रमाणात हा कच्चा माल पुरवला जातोय..आपल्या भारतीय स्थित कंपनीचा यामध्ये किती हिस्सा आहे?
उत्तर : मॉर्डना आणि फायझर लस तयार करण्यामध्ये सिंथेटिक फॉस्फोलिपीडची कामगिरी महत्त्वाची आहे. त्याशिवाय लस तयार होणं शक्य नाही. याचं संशोधन कोरोना येण्यापूर्वीचा आहे. त्यामुळे कोरोना आल्यानंतर ते उपलब्ध झाले. सध्या व्हीएव्ही कंपनीचा यामध्ये दहा टक्के हिस्सा आहे. एकंदरीत हा हिस्सा सध्याची परिस्थिती पाहता खूप मोठा आहे.
प्रश्न : मध्यंतरीच्या काळात कोविशील्ड लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवत असताना भारत-अमेरिका या दोन्ही देशांमध्ये व्यापारी निर्बंध आडवे आले होते. त्यावरुन देशात मोठी चर्चा सुरु होती. अशा वेळी मॉडर्ना आणि फायझरला कच्चा माल पुरवठा करताना व्हीएव्ही कंपनीवर काही दबाव होता का? किंवा ती परिस्थिती कशी होती?
उत्तर : भारत आणि अमेरिका सरकारचं यावर संभाषण नक्की झालं. आपण एकमेकांवर अवलंबून आहोत. अशा प्रकारचं संभाषण ते होतं. पण, प्रत्यक्षरित्या आम्ही त्यामध्ये सहभागी नव्हतो. यावेळी काही करार देखील झाले असतील. पण, अमेरिका आपल्याला लागणारा कच्चा माल पुरवण्याकरता तयार झाली. यावेळी आमच्यावर प्रत्यक्ष असा कोणताही दबाव नव्हता. पण एक भारतीय कंपनी म्हणून तो दबाव असणं स्वाभाविक आहे.
प्रश्न : कोरोनाचं संकट पाहता लसीवरील पेटंट खुले करण्याच्या भारताच्या मागणीला आता अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देखील आपली सहमती दर्शवली आहे. याचा किती मोठा फायदा होणार आहे? एक कंपनी प्रमुख या मागणीकडे तुमचा पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे?
उत्तर : पेटंट खुलं करण्याच्या या निर्णयाकडे दोन बाजूंनी पाहावं लागेल. पहिला मुद्दा म्हणजे त्याचा कमी काळात आणि लगेगच होणार परिणाम आहे. पेटंट खुले झाल्याने सक्षम असलेल्या भारतीय कंपन्या लस तयार करु शकतात. असं असलं तरी भारत या प्रकारचं तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये पूर्णपणे सक्षम आहे. आपण कोणावरही अवलंबून राहू शकत नाही. याचा पुढील वर्षभरासाठी मोठा फायदा होईल यामध्ये काहीच शंका नाही. पण, भविष्याचा विचार करता त्याचा खूप काही फायदा होणार नाही.
प्रश्न : भारताला जगाने मदत न केल्यास संपूर्ण जग संकटात येईल. भारतात जोवर कोरोना आहे तोवर जगावर संकट राहिल असं युनिसेफचं म्हणणं आहे. शिवाय, 'लॅन्सेट'मधून देशातील साऱ्या परिस्थितीवर मत व्यक्त केलं गेलं. युनिसेफ, 'लॅन्सेट'च्या या मतावर काय प्रतिक्रिया आहे?
उत्तर : मी सध्याच्या या मतांना खूप गांभीर्याने घेत नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. सध्या प्रत्येक जण परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण, शेवटच्या व्यक्तीपर्यंत लस पोहोचवण्याचं काम सोपं नाही. लस संपल्यानंतर काही ठिकाणी समस्या होत आहेत. पण, आम्ही जगातील मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांशी बोलत आहोत. त्यावेळी भारत सध्या सक्षमपणे परिस्थिती हाताळत आहे असं मत किंवा निरिक्षण त्यांच्याकडून नोंदवले जात आहे. त्यामुळे टीकेकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही.
प्रश्न : एक भारतीय कंपनी लस तयार करण्यामध्ये देत असलेलं योगदान मोठं आहे. पण, सध्या भारतामध्ये लसींचा तुटवडा आहे. याबाबत व्हीएव्हीकडून या दोन्ही कंपन्यांशी काही बोलणी सुरु आहेत का? भारताला लस देण्याबाबत या कंपन्यांचा अप्रोच कसा आहे?
उत्तर : मॉर्डना किंवा फायझरने भारताला लस पुरवावी याबाबत आम्ही देखील या दोन्ही कंपन्यांशी बोलत आहोत. पण, असं सार्वजनिकरित्या त्यावर बोलणं उचित नाही. याबाबत बोलणं हे गुप्त राखणं सध्या गरजेचं आहे. भारताला लस देण्याबाबत कोणाचंही दुमत नाही. पण, या सर्वांमध्ये नियमांचं पालन आणि त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या या बाबी आहेत हे विसरता कामा नये. शिवाय, वैद्यकीय प्रयोग यशस्वी होणे देखील गरजेचं आहे. त्यामुळे यातून मध्यम मार्ग काढावा लागेल. भारताला लस देण्याबाबत सर्वजण सकारात्मक आहेत.
प्रश्न : सध्या देशातील लसीकरणाच्या साऱ्या परिस्थितीकडे एक कंपनीप्रमुख म्हणून कसं पाहता? सरकार, जनता यांना काय आव्हान असेल? लसींचा तुटवडा किंवा सद्यस्थिती याबद्दलचं विश्लेषण कसं असेल? काय आवाहन असेल तुमचं?
उत्तर : राज्य सरकार, केंद्र सरकारच्या नियमांचं पालन करा. कोरोना काळातील नियम सर्वांनी पाळले पाहिजेत. सध्या लसीकरण वाढणे गरजेचं आहे. सद्यस्थिती पाहता आपण कोणालाही दोष देता कामा नये. सरकारच्या नियमांचं पालन झालंच पाहिजे. लसीकरण वाढेल त्यावेळी कोरोना संसर्गात मोठ्या प्रमाणात घट होईल असं माझं वैयक्तिक निरीक्षण आहे. परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी काही कार्यक्रम राबवावे लागतील. त्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील. देशाची लोकसंख्या पाहता, भूगोल पाहता लसीकरणाला वेळ लागेल. यावेळी सर्वांनी सोशल मीडियावर जास्त विश्वास ठेवता कामा नये. कुणाचा उद्देश काय असेल हे आपण सांगू शकत नाही. हे एक पथ्य सर्वांनी पाळले पाहिजे.