(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange : आरक्षणासाठी कोणी काय केलं, 24 डिसेंबरनंतर सगळंच सांगणार; मनोज जरांगेंचा इशारा
Manoj Jarange : मागील 75 वर्षात कोणी काय केले हे 24 डिसेंबरनंतर आम्ही समाजाच्या पुढे मांडणार आहे. त्यातून सुट्टी होणार नाही, असे जरांगे म्हणाले.
जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. रुग्णालयातुन सुट्टी होताच जरांगे आंतरवाली सराटीत पोहचले आहेत. तसेच, उद्यापासून त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु होत आहे. मात्र, यापूर्वी त्यांनी महत्वाचं वक्तव्य केले आहे. "मराठा समाजाने आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा डाव मोडून काढला आहे. सर्वच जिल्ह्यात नोंदी सापडत आहेत. त्यामुळे 35 ते 40 टक्के लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहे. तर, आरक्षणासाठी कोणी काय केलं हे 24 डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार असल्याचे," जरांगे म्हणाले आहेत.
यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, मागील 75 वर्षात कोणी काय केले हे 24 डिसेंबरनंतर आम्ही समाजाच्या पुढे मांडणार आहे. त्यातून सुट्टी होणार नाही. कोणी काय-काय केलं हे आम्ही काढून ठेवत असून, 24 डिसेंबरनंतर मांडणार आहे. पण, सध्या आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला द्यावे हीच भूमिका आमची असणार असल्याचे जरांगे म्हणाले.
ओबीसी सभेवर प्रतिक्रिया...
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी 17 नोव्हेंबरला अंबडमध्ये भव्य सभा होत आहे. या सभेत छगन भुजबळ, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनके ओबीसी नेते उपस्थित राहणार आहे. दरम्यान, यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, कार्यक्रम घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आमची झाली म्हणून त्यांनी घावी आणि त्यांची झाल्यावर आम्ही घ्यावी अशा खालच्या पातळीवर मी जाणार नाही. सभा घेण्याचा अधिकार लोकशाहीत सर्वांना आहे. ओबीसी नेते याला स्पर्धा समजत असतील पण आम्ही स्पर्धा समजत नाही, असेही जरांगे म्हणाले.
मराठा समाजात मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण
उद्यापासून महाराष्ट्र दौरा सुरु होत असून, याची संपूर्ण तयारी झाली आहे. मराठा समाजात मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर एका गावात थांबण्याचे ठरले होते, मात्र आंतरवालीत येईपर्यंत 17 गावात थांबावे लागले. यावरून परिस्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो. आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी सापडत आहे. आपल्या मुलाला प्रमाणपत्र मिळाले म्हणजे त्याच्या आयुष्याची भाकरीच मिळाली असे प्रत्येकाला वाटत असल्याचे जरांगे म्हणाले.
असा असणार उद्याचा दौरा...
मनोज जरांगे उद्यापासून पुन्हा एकदा राज्याचा दौरा करणार आहे. पहिल्याच दिवशी त्यांच्या तीन ठिकाणी सभा होणार आहे. सकाळी 11 वाजता मनोज जरांगे आंतरवाली सराटी गावातून निघणार आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथे त्यांची पहिली सभा होणार आहे. त्यानंतर परंडा तालुक्यातील परंडा शहरात सभा होईल. तर, शेवटची तिसरी सभा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा वांगी नंबर 1 येथे होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange : आरक्षणासाठी आंदोलनाचं नेतृत्त्व मनोज जरांगेंकडे, मराठा आरक्षण हक्क परिषदेत ठराव