Akola : अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
Akola Election : अकोल्यात 38 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बहुमतासाठी त्यांना आणखी तीन नगरसेवकांची गरज असताना इतर सर्व पक्षांनी त्यांची वेगळी आघाडी केल्याचं दिसून येतंय.

अकोला : अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 'हाय व्होल्टेज पॉलिटिक्स' रंगत असून भाजपविरोधी पक्षांची डिनर डिप्लोमॅसी' पहायला मिळाली. शहराबाहेर असलेल्या सिटी स्पोर्ट्स क्लब येथे ही डिनर डिप्लोमॅसी पार पडली. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, एमआयएम, दोन्ही राष्ट्रवादी आणि अपक्ष आशिष पवित्रकारांची उपस्थिती होती. यावेळी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, एमआयएमचे पदाधिकारी नगरसेवक, याशिवाय सर्वच नगरसेवकांची डिनर डिप्लोमॅसी आणि बैठक झाली. 30 पेक्षा जास्त नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत या पक्षांनी पदांचं वाटप आणि संयुक्त कार्यक्रम यावर चर्चा केली. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने अकोला महापालिकेत कोणतंच पद घेणार नसल्याची भूमिका घेतली. त्यांनी महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती अशी पदं वंचित, ठाकरेंची सेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि अपक्षांना देण्याचा प्रस्ताव ठेवला.
अकोल्यात भाजपला रोखण्यासाठी वंचित, एमआयएम, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थित होत आहे. एकंदरीत 21 नगरसेवक असलेली काँग्रेस म्हणते आम्हाला कुठलंचं पद नको. भाजप विरोधात सर्वांनी एकत्र येत यावं, ही काँग्रेसची भूमिका आहे.
अकोल्यात बहुमताच्या 41 आकड्याची भाजप आणि काँग्रेसकडून मोठी जुळवणी सुरू आहे. दरम्यान, 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही. 38 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. दुसरीकडे काँग्रेसचे 21, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक आहेत. सत्ता स्थापनेत महत्त्वाची आणि 'किंगमेकर'ची वंचित आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेची भूमिका आहे.
कोणत्या पक्षाचा नेमका काय आहे प्रस्ताव?
नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर भाजप विरोधात सर्वच पक्ष एकत्र आल्यास महापालिकेचे महापौर पद ठाकरेंच्या शिवसेना किंवा वंचित यापैकी एकाकडे जाण्याची शक्यता आहे. तर उपमहापौर पद शरद पवारांच्या राष्ट्रवादीला. स्थायी समिती सभापती पद वंचित बहुजन आघाडीला जाणार अशी सूत्रांनी माहिती दिलीय. उर्वरित सभापती पद अपक्ष नगरसेवकांना जाण्याची शक्यता आहे. अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांना स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं जावू शकतंय.
अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल
एकूण जागा : 80
बहुमताचा आकडा : 41
भाजप : 38
काँग्रेस : 21
उबाठा : 06
शिंदे सेना : 01
अजित राष्ट्रवादी : 01
शरद राष्ट्रवादी : 03
वंचित : 05
एमआयएम : 03
अपक्ष : 02
ही बातमी वाचा:
























