Weather Forecast : थंडीचा जोर वाढणार, 'या' भागात मुसळधार पावसाचा अंदाज; बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल
Weather Update Today : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशात काही भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
IMD Weather Update : गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात (Weather Forecast) मोठा बदल झाला आहे. कुठे ऊन, कुठे पाऊस (Rain), तर कुठे थंडी (Winter) ठिकठिकाणी असं वेगवेगळं वातावरण पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशात काही भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. देशात काही ठिकाणी आज पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यात मात्र आज ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून पावसाची शक्यता नाही.
थंडीचा जोर वाढणार
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, त्रिपुरा किनारपट्टी भागातील कमी दाबाचे क्षेत्र आजच्या IST 1730 तासांवर कमी चिन्हांकित झालं आहे. चक्रीवादळ समुद्रसपाटीपासून 1.5 किमी अंतरावर आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरात असलेल्या या चक्रीवादळामुळे देशातील हवामानवर परिणाम होणार असून पुढील 5 दिवसात राज्यासह देशभरात हवामान कसं असेल जाणून घ्या.
राज्यात हवामान कसं असेल?
महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज नाही, पण पारा घसरणार आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात आज थंडीचा कडाका वाढणार आहे. मुंबई पुण्यात पुढील 24 तासांत किमान तापमानात किंचित घट होईल, असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं सांगितलं आहे. त्यासोबतच नागपूर अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर या भागातही सकाळी आणि संध्याकाळी थंडीचा जोर वाढणार असून दुपारी आकाश स्वच्छ असेल.
तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
आज आणि उद्या नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21 रोजी आंध्र प्रदेश आणि 22 नोव्हेंबर 2023 रोजी तामिळनाडू किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 18 ते 22 नोव्हेंबर 2023 दरम्यान वरील प्रदेशात गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
'या' भागात पाऊस पडण्याचा अंदाज
आज अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. केरळ आणि माहे, अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या वेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 19 नोव्हेंबरला आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या भागात दाट धुक्याची चादर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. देशाच्या इतर भागात हवामानात जास्त बदल जाणवणार नाही, ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.
बिहार, झारखंड, मणिपूरमध्ये काही ठिकाणी किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त घट होईल. पश्चिम बंगाल, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि यानाम, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, पंजाब वरील बहुतेक ठिकाणी सामान्यपेक्षा जास्त तापमान आहे. पूर्व उत्तर प्रदेश, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये अनेक ठिकाणी थंडी वाढली आहे. यासोबतच हरियाणा-चंडीगड-दिल्ली, ओदिशा, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, उत्तर केरळ, पूर्व मध्य प्रदेश, गुजरात, पश्चिम राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश येथे वेगळ्या ठिकाणी तापमानात घट झाली आहे. राजस्थानच्या वेगळ्या भागांत सामान्यपेक्षा कमी तापमान नोंदवलं गेलं आहे.