Weather Update : कोकणसह मराठवाड्यात पावसाचा अंदाज, पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस गारपिटीची शक्यता
कोकण आणि मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसासह गारपिटीचीही शक्यता हवामान विभागनं वर्तवली आहे.
Weather Update : राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. कोकण आणि मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसासह गारपिटीचीही शक्यता हवामान विभागनं वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश या भागात गेल्या दीड महिन्यापासून तीव्र उष्णतेची लाट सुरु आहे.
दरम्यान, कोकण मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी, विदर्भ आणि आसपासच्या परिसरात हवामान कोरडे राहून तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर गेल्या दीड महिन्यापासून उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट सुरु आहे. या भागाकडून महाराष्ट्राकडे उष्ण वारे वाहत आहेत. तर, दक्षिणेकडून महाराष्ट्राकडे दमट वारे वाहत आहेत. या दोन्ही वाऱ्यांची टक्कर महाराष्ट्रावर होत असल्यानं कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत 13 ते 14 एप्रिल दरम्यान या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपिटीसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूरच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. मुख्यत: फळबागांना मोठा फटका बसला आहे. आंबा, द्राक्ष या बागांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तर काही ठिकाणी वादळी वारे आणि पावसामुळं घरे पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर या घटनांमध्ये सांगली जिल्ह्यात काही जण जखमीही झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Buldhana Farmers News : डाळ आयातीला केंद्र सरकारची मुदतवाढ; बुलढाण्यात शेतकऱ्यांचे आंदोलन, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
- Milk FRP: दूध एफआरपीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक; देशभरात संघर्ष उभारणार