(Source: Poll of Polls)
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज...
Maharashtra Rain: राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Rain: एप्रिल महिन्यांत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत. राज्यातील बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती, बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामध्ये शेती पिकांसह घरांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेकांचा संसार या वादळी पावसामुळं उघड्यावर पडला आहे.
हवामान खात्याने आता राज्यात पुढील पाच दिवस देखील अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपुरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात गारपीटीचा इशारा
मराठवाड्यामधील परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातुरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
मुंबई, ठाण्यात तुरळक पावसाची शक्यता
मुंबई आणि ठाण्यात देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच मुंबईतील काही भागांत आज, रविवारीदेखील हलका पाऊस देखील झाला.
आजही अवकाळीची हजेरी
दरम्यान, रविवारी रात्री, बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसामुळं वातावरणात कमालीचा गारवा आहे. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली. जवळपास एक तास पाऊस बरसला. मुसळधार पावसानं चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात पाणी साचले होते. सांगोली तालुक्यातील वाढेगाव परिसरातील दिघे वस्ती, हजारे वस्ती इंगोले बामणे वस्ती या भागातील वादळी वाऱ्यामुळं अनेक घरावरील पत्रे उडून गेले आहेत. यामुळं घरातील संसार उपयोगी साहित्य आणि धान्याचं मोठं नुकसान झालं आहे. जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटीमुळं केज तालुक्यातील कुंभेफळ परिसरात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. यावेळी गारांचा इतका मोठा सडा पडला की, लोकांनी घरातून अगदी टोपल्यानं गारा भरुन बाहेर नेऊन टाकल्या आहेत. अचानक झालेल्या गारपिटीमुळं भाजीपाल्यासह फळबागांचही मोठे नुकसान झालं आहे.
सध्या सुरु असलेला वातावरण बदलाचा परिणाम शेत पिकांवर होत आहे. कधी कडाक्याचे ऊन तर कधी गारपीटसह पाऊस त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. सततच्या या वातावरण बदलामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.