Waterfall: दाट धुकं आणि कोसळणारे धबधबे, पावसाळ्यात खुललं सह्याद्रीचं सौंदर्य
Waterfall: पावसाळ्यात निसर्गरम्य धबधब्यांवर पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. तसेच सह्याद्रीमधील अनेक धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Waterfall: पावसाळ्यात सह्याद्रीचे (Sahyadri) डोंगर हिरवीगार शाल पांघरतात आणि त्याचं सौंदर्य हे पर्यटकांना भूरळ घालतं. सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत ते कोसळणारे धबधबे. या धबधब्यांमध्ये (Waterfall) चिंब भिजून पावसाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांची रेलचेल सध्या पाहायला मिळत आहे. या पर्यटनस्थळांना आणि धबधब्यांना भेट देऊन एक सकारात्मक उर्जा मिळवण्याचा प्रयत्न हे पर्यटक करताना पाहायला मिळत आहे. यामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत ते शेळवा आणि मंगोली येथील धबधबे.
फेसळणारा शेळवा धबधबा
सह्याद्रीच्या कडेकापारीतून 200 ते 250 फुटांवरून मनमुरादपणे फेसाळणारा दुधासारखा पांढरा शुभ्र शेळवा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य घोडगे गावात हा धबधबा कोसळत आहे. दाट धुकं, मुसळधार पाऊस, समोर अवाढव्य असा सह्याद्री अशा निसर्गसौंदर्यात खळखळ वाहणारं धबधब्याचं पाणी हे सगळं मंत्रमुग्ध करत आहे.
त्यामुळे पर्यटकांना शेळवा धबधबा आकर्षित करत आहे. जर तुम्हाला देखील या निसर्गाचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर सह्याद्रीच्या कुशीतून वाहणाऱ्या शेळवा धबधब्याला नक्की भेट द्या. त्यासाठी तुम्हाला घोडगे गावात जावं लागेल. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जवळपास 45 किमी अंतरावर हे गाव आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून कोसळणारा मंगोली धबधबा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावात गर्द हिरवाईतून उंच डोंगरावरून नयनरम्य धबधबा कोसळतो. दोडामार्ग तालुक्यातील तिलारीचं खोरं हे पावसाचं माहेरघर म्हणून राज्यभरात ओळखलं जातं. येणाऱ्या पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण म्हणजे मांगेलीचा हा धबधबा. जो गर्द हिरवाईतून उंच डोंगरावरून कोसळतो. त्यातून अंगावर पडणारे असंख्य तुषार पर्यटकांना मोहिनी घालतात. मांगेली धबधब्याचा परिसर अतिशय निसर्गरम्य असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते.
मांगेली गावात गेल्यानंतर उंच डोंगर कपारीतून कोसळणारा धबधबा नजरेस पडतो. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पायी डोंगर-दऱ्यातून वाट काढत धबधब्यावर जावं लागतं. त्यामुळे पर्यटकांना ट्रेकिंगचा आनंद अनुभवता येतो. या भागातील डोंगरमाथ्यावरून वाहणारे धबधबे, गर्द हिरवाईने नटलेला परिसर आणि अधूनमधून कोसळणारा पाऊस, अंगाला झोंबणारा गारवा असे हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना भुरळ घालते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून अवघ्या 43 किलोमीटर अंतरावर हा परिसर आहे. या धबधब्याचे पाणी थेट तिलारी धरणात जातं.
पावसाळ्यात खुलंल जव्हारचं सौंदर्य
मुंबई लगत असलेल्या पालघर मधील जव्हार हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ प्रसिद्ध आहे. या पर्यटन स्थळाला मिनी महाबळेश्वर म्हणूनही संबोधलं जातं. जव्हारच्या आजूबाजूला दाभोसा, हिरडपाडा आणि काळ मांडवी हे पर्यटकांना आकर्षित करणारे मनमोहक धबधबे आहेत. अतिदुर्गम भागात असलेला दाभोस धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. जव्हार तालुक्यापासून 20 किमी अंतरावर हा दाभोस धबधबा वसलेला आहे. या धबधब्याची उंची किमान 300 फूट आहे.
पर्यटकांची गर्दी दाभोसमध्ये वाढत चालल्याचं चित्र सध्या आहे. पालघर जिल्हयासह मुंबई तसेच गुजरात ,नाशिक आणि सिल्वासा येथून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या धबधब्याला भेट देतात. विशेष म्हणजे बाराही महिने हा धबधबा खळखळून वाहत असतो. त्यामुळे पावसाळा सुरु नसतानाही पर्यटकांना या स्थळाचा आनंद घेता येतो. पण पावसाळ्यात मात्र या धबधब्याचं सौंदर्य अधिक खुलतं.