एक्स्प्लोर
अंत्यसंस्कार झालेली संगीता पांडे जेव्हा जिवंत उभी ठाकते!

वर्धा : संगीता पांडे नावाच्या महिलेवर एकदा अंत्यसंस्कार झाले. मात्र त्या जिवंत आहेत. पोलिसांना चक्रावून सोडणारी ही घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथं घडली. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस स्टेशन परिसरातून संगीता पांडे बेपत्ता झाल्या. 5 मे रोजी आर्वी जवळच्या जंगलात एका महिलेचा मृतदेह सापडला. मृतदेहाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. हा मृतदेह संगीता पांडे यांचा असल्याचा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी नातेवाईकांना बोलावलं आणि नातेवाईकांनी मृतदेह संगीता पांडेंचा असल्याचं सांगितलं. संगीता पांडेची हत्या कुणी केली, याचा शोध सुरु झाला. तपासात संगीता पांडेचं एक प्रेमप्रकरण सुरु असल्याचं पुढे आलं. मग पोलिसांनी प्रियकराचा शोध घेतला. हैदराबादमधून दिनेश खरबारला ताब्यात घेतलं. संगीताची हत्या का केली याचा पोलिसांनी जाब विचारला.पण प्रियकर दिनेश खरबारनं संगीताला पोलिसांसमोर जिवंत उभं केलं. काही दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार झालेल्या संगीता जिवंत झाल्या. संगीता पांडेच्या कथित हत्येचं कोडं अखेर उलगडलं. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी कमी झाली पण आर्वीच्या जंगलात सापडलेला महिलेचा मृतदेह कुणाचा आहे. आणि त्या महिलेची हत्या कुणी केली. याचा तपास करण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.
आणखी वाचा























