Wardha : एका हाताने टाळी वाजवण्याचा विक्रम, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
One Hand Clap : वर्ध्यातील रोशनच्या एका हाताने टाळी वाजविण्याच्या कलेची 'इंडिया बुक ऑफ रेकार्ड' मध्ये नोंद झाली आहे.
One Hand Clapping Record : 'एका हाताने टाळी वाजत नाही' ही म्हण वापरताना आता विचारच करावा लागेल कारण वर्ध्यातील एका तरुणाने ही म्हण चक्क खोटी ठरवली आहे. या तरुणाने एका हाताने टाळी कशी वाजते हे दाखवून दिलं आहे. एवढंच नाही तर अवघ्या 30 सेकंदात तब्बल 180 पेक्षा अधिक टाळ्या वाजवत त्याने विक्रम केला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या तरुणाच्या या अनोख्या विक्रमाची 'इंडिया बुक ऑफ रेकार्ड' मध्ये नोंद झाली आहे. रोशन संजय लोखंडे असं या तरुणाचं नाव आहे. आजच्या काळातला तरुण अनेक कलागुणांनी भरलेले असतात. त्यामुळेच त्यांच्या डोक्यात नवनवीन संकल्पना सुरू असतात आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द असते. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील रोशन लोखंडे या तरुणाने अनोख्या कलेने आपल्या कुटुंबाचं आणि गावाचं नाव रोशन केलं आहे.
'इंडियां बुक ऑफ रेकार्ड 2022' बुक मध्ये रोशनचं नाव
वर्धा जिल्ह्यातील रोशन संजय लोखंडे या तरुणाने एका हाताने 30 सेकंदात 180 पेक्षा अधिक टाळ्या वाजवण्याचा विक्रम केला आहे. याचीच दखल 'इंडिया बुक ऑफ रेकार्ड' या संस्थेने घेतली आहे. त्याच्या या अद्भुत कलेला वाव देण्याकरिता 'इंडिया बुक ऑफ रेकार्ड 2022' मध्ये रोशनचं नाव नोंदविलं गेलं आहे.
एका हाताने नेमकी टाळी वाजते कशी ?
'हात कोपऱ्यापासून सरळ रेषेत ठेवल्यानंतर हाताचा पंजा तळव्याकडे झुकवला आणि तळव्याच्या शेवटी बोटे एकमेकांवर आदळून एका हाताने टाळी वाजवली जाते. अन् एका हातानेच टाळी वाजते!' दिसायला हे सरळ सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात तितकं सोपंही नाही. एका छोट्याश्या गावातील तरुणाने हा पराक्रम करुन दाखविला आहे आणि राष्ट्रीय स्तरावर आपले व आपल्या गावाचे नाव पोहचविले आहे.
इंडीया बुक ऑफ रेकार्ड ने रोशनचे नाव नोंदविल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
रोशनला पाहून इतरांनीही केला प्रयत्न
रोशन एका हाताने टाळी वाजवतो हे बघून त्याचे मित्र किंवा गावकरी यांच्यासह अनेकांनी एकाच हाताने टाळी वाजवून बघण्याचा प्रयत्न करतान दिसत आहेत. बातमी वाचताना कदाचित तुम्हीही हा प्रयत्न कराल. मात्र हे दिसतं तेवढं सोपं नाही आणि अवघ्या 30 सेकंदात तब्बल 180 पेक्षा जास्त टाळ्या वाजवणं तर अवघडच आहे.