हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; आरोपीला 10 मिनिटासाठी ताब्यात द्या, नातेवाईकांची संतप्त प्रतिक्रिया
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेच्या आई-वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीलाही पेट्रोल टाकून जाळलं पाहिजे, असं पीडितेच्या आईने म्हटलं आहे. हे सांगताना त्यांच्या भावना अनावर झाल्या.
नागपूर : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडित मुलीवर सध्या नागपूरमध्ये उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ज्याप्रमाणे आमच्या मुलीला त्रास होतो आहे, तसाच त्रास आरोपी विक्की नगराळेला झाला पाहिजे. आरोपीला पेट्रोल टाकून पेटवून दिलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडित मुलीच्या आईने दिली आहे.
आरोपी विक्की नगराळे असं काही कृत्य करेल याची कल्पना नव्हती. कुणीही त्रास दिला तर आम्हाला सांग, असं आम्ही तिला नेहमी सांगायचो. मात्र ती काही सांगत नव्हती. आज आमच्या मुलीला खूप त्रास होत आहे. तिला ज्या वेदना होत आहेत, तशाच वेदना आरोपीला झाल्या पाहिजेत, असं पीडितेच्या आईने म्हटलं आहे. ती फक्त हाताने काहीतरी सांगत आहे. आम्हाला थांब म्हणते, बस म्हणते. तिला बोलता येत नाही. तू धीर धर, तू बरी होशील, तू ठीक होशील, धीर सोडू नको, असं मला तिला सांगायचं आहे पण सांगता येत नाही, अशा भावनिक प्रतिक्रिया पीडितेच्या आईने दिली आहे.
हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; तरुणीची प्रकृती गंभीरच, आरोपीला कृत्याचा पश्चाताप नाही
आरोपी विक्की तीन महिन्यांआधी बसमध्ये मुलीला काहीतरी बोलला होता. त्यावेळी तिने लगेच फोन करून आम्हाला कळवलं होतं. तेव्हा फोन करुन मी विक्कीला झापलं होतं. त्यानंतर त्याने मी तिला त्रास देणार नाही, असं कबूल केलं होतं. त्यानंतर तो असं काही करेल असं वाटलं नव्हतं. तिची सध्याची परिस्थिती मला बघवत नाही, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली.
धक्कादायक! वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
तीन महिन्यापूर्वीच याबाबत पोलिसात तक्रार करायला हवी होती. आता केवळ 10 मिनिटांसाठी आरोपीला आमच्या ताब्यात द्यायला हवं. त्याला लगेचच शिक्षा झाली पाहिजे. हैदराबादमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींबाबत पोलिसांनी जी भूमिका घेतली तशीच भूमिका घ्यायला हवी, असं पीडितेच्या मामाने म्हटलं.
आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी
आरोपी विक्की नगराळेला न्यायालयात आज हजर करण्यात आलं. न्यायाधीश रत्नमाला डफरे आरोपीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील एस डी गावडे यांनी बाजू मांडली. तर आरोपीचं वकीलपत्र कुणीही न भरल्याने न्यायालयाने विधी सेवा प्राधिकारणातर्फे त्याला वकील पुरवला.