धक्कादायक! वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुणीला जिंवत जाळण्याच प्रयत्न झाला आहे. या हल्ल्यात तरुणीचा चेहरा पूर्णत: भाजला असून तिची वाचाही गेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
![धक्कादायक! वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न Attempt to burn girl alive in Hinganghat in Wardha धक्कादायक! वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/03184506/Wardha-Girl-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
वर्धा : वर्ध्यातील हिंगणघाट येथे शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. या तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न नंदोरी चौकात झाला. हल्ल्यात भाजलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित तरुणी एका महाविद्यालयात तासिका तत्वावर शिकवण्याचं काम करत असल्याची माहिती मिळत आहे.
विक्की नगराळे (27 वर्ष) या नराधमाने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विक्कीला टाकळघट परिसरातून अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. पीडित तरुणी आणि आरोपी दोघेही एकाच दारोडा गावचे रहिवासी आहेत. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पीडित तरुणी आज सकाळी कॉलेजमध्ये जात असताना नंदोरी चौकापासून काही अंतरावर दुचाकीवर आलेल्या युवकाने तिच्या अंगावर पेट्रोल फेकलं आणि तिच्या हातात पेटवलेला टेंभा फेकून तिला पेटवून दिलं. त्यानंतर लगेचच त्याने घटनास्थळवरुन पळ काढला. युवतीने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिच्या अंगावर पाणी टाकून तिचे प्राण वाचवले. त्यानंतर तिच्यावर जवळील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आणि नंतर तिला नागपूरच्या रुग्णालयात दाखल केलं.
या हल्ल्यात तरुणी 35 टक्के भाजली असून तिचा चेहरा पूर्णत: भाजला आहे. तरुणीच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर धूर गेल्याने तिची वाचा देखील गेली आहे. तसेच तिची दृष्टीही राहिल की नाही, अशी शंका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. तिच्यावर सध्या नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विक्की आणि पीडित तरुणी यांच्यात तीन महिन्यांपूर्वीही बसमध्ये वाद झाला होता. पीडित तरुणीची इच्छा नसताना विक्की तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तरुणीने याबाबत आपल्या कुटुंबियांना कळवलं होतं. आरोपी विक्कीने शांत डोक्याने नियोजन करुन तरुणीवर हल्ला केल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)