(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पूर्ण, महाविकास आघाडी की भाजप? भवितव्य मतपेटीत बंद
विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढत आहेत. राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडली. आज सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. तर 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या मतदानाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
मतदानाची टक्केवारी :
- सांगली : मतदान टक्केवारी 4 वाजेपर्यंतची : पुणे पदवीधर 52.69 टक्के तर शिक्षक मतदार संघात 76.69 टक्के मतदानाची नोंद.
- चंद्रपूर : पदवीधर मतदारसंघासाठी 4 पर्यंत 54.16 टक्के मतदान
- वर्धा : पदवीधर मतदारसंघाकरिता 4 वाजेपर्यंत 56 %टक्के मतदान
- नागपूर पदवीधर मतदारसंघात दुपारी 4 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान.
- जालना जिल्हा : 4:00 पर्यंत एकूण मतदान 55.00%.
- अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2020 : दुपारी 4 पर्यंत अमरावती विभागात 68.65 टक्के मतदान.
- औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक : परभणीत सकाळी 8 ते 4 दरम्यान 58.63 % मतदान.
- पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चार वाजेपर्यंत 52.69 तर शिक्षक मतदारसंघासाठी 76.69 टक्के मतदान.
- विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ सोलापूर : पदवीधर मतदार संघ 52.10% तर शिक्षक मतदार संघ 77.12%
कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकाकडून मतदान अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात आज पार पडलेल्या निवडणुकित कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या शिक्षकांनी आज मतदानाचा हक्क बजावला. यवतमाळ शहरातील तहसील कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर आयसुलेशन वॉर्ड तयार करण्यात आलं होत. या ठिकाणी लक्षणं नसलेल्या कोरोना पॉझिटीव्ह 3 शिक्षकांना मतदान करण्याआधी आणण्यात आले. या ठिकाणी PPE किट घालून या कोरोना पॉझिटीव्ह मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
महाविकास आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर शिवसेनेचा एक उमेदवार रिंगणात आहेत.
अमरावती शिक्षक मतदारसंघ - श्रीकांड देशपांडे, शिवसेना पुणे पदवीधर मतदारसंघ - अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शिक्षक मतदारसंघ - प्रा. जयंत आसगांवकर, काँग्रेस औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर पदवीधर मतदारसंघ - अभिजीत वंजारी, काँग्रेस
भाजपचे उमेदवार
तर भाजपनेही महाविकास आघाडीविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात उमेदवारी न दिल्याने रमेश पोकळे यांनी बंडखोरी केली आहे. या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार कोण हे जाणून घेऊया
- अमरावती शिक्षक मतदारसंघ - डॉ. नितीन धांडे
- पुणे पदवीधर मतदारसंघ - संग्राम देशमुख
- पुणे शिक्षक मतदारसंघ - जितेंद्र पवार (भाजप पुरस्कृत अपक्ष)
- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - शिरीष बोरनाळकर
- नागपूर पदवीधर मतदारसंघ - संदीप जोशी