(Source: Poll of Polls)
Vinod Tawde : तेजस्वीला मुख्यमंत्री नको म्हणूनच राजदला सत्तेतून हटवलं; विनोद तावडेंचा सत्ताबदलाचा गौप्यस्फोट
Vinod Tawde Majha Katta : इंडिया आघाडीमध्ये धुसफूस सुरू होती. त्याचाच फायदा घेत आम्ही बिहारमध्ये सत्ताबदल केला असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी माझा कट्टावर केला.
Vinod Tawde Majha Katta : लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी जेडीयू (JDU) फोडण्याचा प्रयत्न केला. तसं करून तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले असते. तर गुंडाराज आलं असतं. ते रोखण्यासाठीच नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबत पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केला. विनोद तावडे यांनी 'माझा कट्टा'वर संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केले.
विनोद तावडे यांनी सांगितले की, इंडिया आघाडीमध्ये सगळं आलबेलं नव्हते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आघाडीचे अध्यक्ष नियुक्त केल्यानंतर नितीश कुमार नाराज झाले होते. त्यातच लालू प्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्याचे प्रयत्न सुरू होते. भाजपने त्यांच्यातील नाराजीचा फायदा आम्ही घेतला. जेडीयूमधील काही नेते संपर्कात होते. त्यांच्यासोबत संवाद होता. त्यातूनच आम्ही सत्ताबदल केला असल्याचे विनोद तावडे यांनी म्हटले.
चंदीगडमध्ये गैरप्रकार नाही, तावडेंचा दावा
चंदीगड महापौर निवडणुकीत कोणताही गैरप्रकार झाला नाही. आप आणि काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे असल्याचे तावडे यांनी म्हटले. पंजाब, चंदीगडमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये धुसफूस आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी चंदीगड लोकसभेच्या जागेवर दावा केला होता. ही बाब काँग्रेस नगरसेवकांना खटकली. काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर आपकडे वळली आहेत. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांमध्ये मान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाराजी होती, असेही तावडे यांनी म्हटले.
ठाकरेंना सहानुभूती मतांमध्ये वळवण्यात अपयश
नितीश कुमार यांनी भाजपसोबत पहिल्यांदा आघाडी तोडताना एका मर्यादेपर्यंत टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृ्त्वातील शिवसेनेने भाजपवर टीका करताना ती मर्यादा ओलांडली असल्याचे विनोद तावडे यांनी म्हटले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळातही मी काम केले आहे. मात्र, मागील काही वर्षात उद्धव यांच्या काळात टोकाची टीका करण्यात आली. उद्धव ठाकरे यांना काही काळापूर्वी लोकांची सहानुभूती होती. मात्र, त्यांना ती आपल्या मतांमध्ये वळवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे उद्धव यांनी ती संधी गमावली असून आमच्याकडे मतदार वळले असल्याचे आमचे विश्लेषण असल्याचे विनोद तावडे यांनी म्हटले.