(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परभणीत सुटकेचा थरार! पुरात ट्रॅक्टरसह पाच जण वाहून गेले, किर्र अंधारात गावकऱ्यांनी जीवाची बाजी लावून वाचवले प्राण
परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील फाल्गुनी नदीत ट्रॅक्टरसह वाहून गेलेल्या पाच जणांचे प्राण शेळगाव येथील गावकऱ्यांनी जीवाची बाजी लावून वाचवले आहेत.
परभणी : परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील फाल्गुनी नदीत ट्रॅक्टरसह वाहून गेलेल्या पाच जणांचे प्राण शेळगाव येथील गावकऱ्यांनी अथक परिश्रम करुन वाचवले आहेत. नदीला पूर आलेला असताना याच पाण्यातून ट्रॅक्टर काढणे ट्रॅक्टरचालकाला महागात पडले आहे. ट्रॅक्टरचालकाच्या अतिउत्साहीपणामुळं पाच जणांचे जीव टांगणीला लागले होते. मात्र शेळगावच्या नागरिकांनी अंधार असतानाही जीवाची बाजी लावून या पाच जणांचे प्राण वाचवले.
सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठला जोडणाऱ्या शेळगाव उक्कडगाव रोडवरील फाल्गुनी नदीला सकाळ पासुनच पूर आला होता. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतुक सकाळपासूनच बंद होती. सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेळगावहून उक्कडगावकडे एक ट्रॅक्टर जात असतांना शेळगावच्या काही नागरिकांनी त्यांना पाणी वाढले असल्याने न जाण्याची सुचना केली तरी ही ट्रॅक्टर चालकाने जाण्याचे ठरवले. थडी पिंपळगाव येथील दोन जण आपल्या मोटारसायकल वर गावाकडे जाण्याची वाट बघत बसलेले होते ते ही या ट्रॅक्टरमध्ये आपल्या मोटारसायकलसह बसले.
या ट्रॅक्टरमध्ये एकूण पाच जण उक्कडगावकडे जात असतांना फाल्गुनी नदीवर हा ट्रॅक्टरमध्येच उलटला व पुलाखाली गेला यात बसलेले सर्वच जण वाहून गेले यातील दोन जणांना पोहता येत नसल्याने ते बुडत होते पण सुदैवाने चिल्लारीच्या झाडाला अडकले व पोहता येणाऱ्या तिघांनी पण झाडाच्या सहाऱ्याने पकडून ठेवले व आरडाओरडा सुरु केला.
शेळगाव येथील सोहेल शेख या मुलाने हा आराडाओरडा ऐकुन गावात येऊन नागरीकांना ही बाब सांगीतली .गावकऱ्यांनी ताबडतोब धाव घेऊन मदत सुरु केली. दोर व ट्युब च्या सहाय्याने वाहुन गेलेल्या पाचही जणांना वाचवण्यात यश आले आहे. या वेळी सोनपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप काकडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य चालवले.
यात दिपक गुलाब कदम वय 27 वर्षे,बाबासाहेब सुभाष कदम वय 32 दोघे रा.थंडीपिंपळगाव, गोट्या राजेभाऊ कांबळे वय 45 रा. शेळगांव, रामा धुराजी उफाडे वय 43 रा गंगापिंपरी, शिवाजी बबन आडे वय 42 रा. शेळगांव तांडा यांना वाचवण्यात आले. या बचाव मोहिमेत शेळगावकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन वाहुन गेलेल्या व्यक्तींचे प्राण वाचवले .