Dhule News : दोंदवाड गावातील Paani Foundation च्या कामावर ग्रामस्थांचं अतिक्रमण, कारवाईची मागणी
दोंदवाड गावात ज्या ठिकाणी पाणी अडवण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तिथे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलं आहे. अनेकांनी घरं बांधण्यास सुरुवात केली आहे तर काहींनी वॉल कम्पाऊंड बांधले.

धुळे : धुळे तालुक्यातील दोंदवाड गावाला 2019 च्या वॉटर कप स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळालं होतं. मात्र ज्या ठिकाणी हे काम करण्यात आले होते त्या गावठाण जागेवर ग्रामस्थांनी अतिक्रमण केलं आहे. या प्रकरणी प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
दुष्काळग्रस्त महाराष्ट्र ही ओळख पुसली जावी यासाठी सत्यजित भटकळ, आमिर खान, किरण राव आणि रीना दत्ता यांच्या संकल्पनेतून पानी फाऊंडेशनची स्थापना झाली. पानी फाऊंडेशनचा उद्देश राज्यभरातील अनेक गावांचा पाणीपुरवठा पूर्ववत करणे हा आहे. या संस्थेच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा घेण्यात आली होती. 2019 साली या स्पर्धेत धुळे तालुक्यातील दोंदवाड हे गाव सहभागी झाले होते. या गावाला या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळालं होतं. गावाच्या मोठ्या गावठाण जागेवर तलाव बांधून तब्बल 55 कोटी लिटर पाणी अडवण्यात आलं होतं. यामुळे संपूर्ण गाव सुजलाम-सुफलाम झालं होतं.
मात्र दोनच वर्षात या गावठाण जागेवर ज्या ठिकाणी पाणी अडवण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्या ठिकाणी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलं आहे. अनेकांनी या ठिकाणी घरं बांधण्यास सुरुवात केली आहे तर काहींनी वॉल कम्पाऊंड बांधले आहेत. या ठिकाणी लावण्यात आलेली झाडं देखील तोडण्यात आली असून बक्षिसाची मिळालेली रक्कम अजूनही ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा आहे, मात्र ही रक्कम खर्च करायची तरी कशी असा महत्त्वाचा प्रश्न या स्पर्धेतील सहभागी झालेल्यांच्या पुढे उभा राहिला आहे.
या अतिक्रमणाबाबत जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे वारंवार तक्रार करुन देखील कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे यंदा होणाऱ्या पावसाळ्यात पाणी अडवायचे तरी कसे असा महत्त्वाचा प्रश्न या अतिक्रमणामुळे उभा राहिला आहे.
संबंधित बातम्या
Paani Foundation : पृथ्वीचं संवर्धन करणाऱ्या प्रकल्पांच्या यादीत पानी फाऊंडेशन जगात नंबर वन!
टीमवर्कमधून समृद्ध गावांची निर्मिती शक्य; पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
Before You Go
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
महत्त्वाच्या बातम्या





















