(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आमच्या हृदयात आरतीसाठी राम, त्यांची रामआरती केवळ मतांसाठी - वडेट्टीवार
Eknath Shinde : अयोध्येला गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना रामभक्त, विरोधकांना जागा दाखवेल अशी बोचरी टीका केली.
Vijay Wadettiwar on Eknath Shinde : अयोध्येला गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना रामभक्त, विरोधकांना जागा दाखवेल अशी बोचरी टीका केली. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भंडाऱ्यात त्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की,'मुख्यमंत्री विरोधकांना जागा दाखविण्यासाठी शरयू नदीच्या काठावर गेलेत. आम्ही, "राम के नाम वोट" मागणारे नाहीत. श्रीराम हे आमच्या हृदयात आहेत. हृदयातून रामाची पूजा करतो आणि हे मतांसाठी रामाची आरती करतात.' आरतीसाठी जे शरयू नदीच्या काठावर आहेत, जनता त्यांना नदीत ढकलल्याशिवाय राहणार नाही. रामाच्या नावाचा बाजार मांडल्या जात असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी करताना, जनतेला किती वेळ बनवाल. राम राम म्हणून महात्मा गांधींनी प्राण त्यागला. रामरामाने माणसे जोडली जातात. श्रीरामाचा नवीन नारा लावून माणसे तोडण्याचं काम सुरू आहे. त्यांच्या मुखात राम मतासाठी आणि आमच्या मुखातील राम पूजनासाठी असल्याचे प्रत्युत्तर वडेट्टीवार यांनी दिले.
सावरकर हे शिंदेंचे दैवत
स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत असून त्यांचा अपमान सहन करणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना सुनावले. यावर वडेट्टीवार यांनी त्यांचा समाचार घेताना, सावरकर हे शिंदेंचे दैवत आहे. महाराष्ट्राचे दैवत मा जगदंबा, महाराष्ट्राचे दैवत साईबाबा, महाराष्ट्राचे दैवत संतश्रेष्ठ गजानन महाराज, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे दैवत डॉ बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे दैवत महात्मा ज्योतिबा फुले असून, त्यांचा अपमान झाला तर महाराष्ट्राचा अपमान होतो. त्यांच्या लेखी कोणाचा अपमान झाला तर त्यांनाच माहीत, अशी खरमरीत टीका वडेट्टीवर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे नावं न घेता भंडाऱ्यात केली.
मैदान कुणाच्या बापाचं नाही - वडेट्टीवार
नागपूर येथे होऊ घातलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. वर बोलताना वडीटीवर यांनी भाजपच्या कानपिचक्या घेताना, मैदान कोणाच्या बापाचं नाही, मैदानाची परवानगी मिळालेली आहे मैदान कोणाची खाजगी जागा आहे का? मैदान कोणाची मिळकत आहे का? मैदान सरकारी आहे. या देशात भाषण करण्यासाठी घटनेमूळ स्वातंत्र्य मिळाले आहे. कुणी अडथळा आणणार नाही. लोकशाही मार्गाने ती सभा आम्ही करू, असे वडेट्टीवार यांनी विरोधकांना ठणकावले.
आशिष देशमुख यांनी सुपारी घेवून केलेले वक्तव्य - वडेट्टीवार
आशिष देशमुख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. त्यावर आशिष देशमुख यांनी त्यांच्यावर काँग्रेसनं चुकीची कारवाई केल्याचे खापर आता काँग्रेसवर फोडत आहेत. यावर बोलताना बडेट्टीवर यांनी, शिस्तभंग समितीसमोर उत्तर मांडण्याची त्यांना संधी देण्यात आली होती. ती संधी मांडली नसल्याने कदाचित त्यांच्यावर कारवाई झाली असावी. देशमुख यांचे वक्तव्य कुणाकडून पान सुपारी घेऊन केल्याचे वाटत आहे. पक्षश्रेष्ठींवर त्यांच्याकडून होत असलेल्या टीका याला आवाज उठवणे म्हणत नाही. चीन संदर्भात भाजपची दुटप्पी भूमिका आहे. पक्षश्रेष्ठींवर होत असलेली पक्षातील टीका असा कुठल्याही पक्षात सहन होत नाही.
वारंवार आघडीचीच सभा घ्यायची का?- वडेट्टीवार
नागपूर येथे 16 एप्रिलला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. नंतर नागपूर येथेच राहुल आणि प्रियंका गांधी यांची ही सभा होत आहे. यावर बोलताना भरीत तिवारी यांनी वारंवार महाविकास आघाडीचीच सभा घ्यायची का? प्रश्न उपस्थित करून महाविकास आघाडीची होत असलेली सभा ती यशस्वी करायची आहे. कदाचित राहुल गांधीजी आणि प्रियंका जी यांच्या वेळ मिळाल्या असतील, त्यामुळे काँग्रेस पक्षाची ही स्वतंत्र सभा नागपुरात होत आहे. यापूर्वी उद्धवजी ठाकरे यांची खेडमध्ये स्वतंत्र सभा झाली. आघाडीची सभा काही सांकेतिक ठिकाणी घेत आहोत. पक्षाची सभा म्हणून आमचे नेते येत असल्याने ती सभा घेणे म्हणजे काही भांडणे किंवा मतभेद असण्याचे कारण नसल्याचे स्पष्टीकरण वडेट्टीवार यांनी दिले.