Vijay Shivtare : मी धर्मयुद्ध स्वीकारलंय; झुंडशाही, पवार पर्व संपवण्यासाठीची लढाई; विजय शिवतारेंनी अखेर रणशिंग फुंकले!
Vijay Shivtare : यांना कशासाठी मतदान करायचे, शरद पवारांनी आम्हाला काय दिलं, अजित पवारांनी काय दिलं, उलट प्रचंड अत्याचार केले.
बारामती : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) अखेर अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधात रणशिंग फुंकले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Constituency) आपण निवडणूक लढवणार असून, 12 तारखेला आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा विजय शिवतारे यांनी केली आहे. यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा देखील घेणार असल्याचे शिवतारे म्हणाले. मी धर्मयुद्ध स्वीकारले असून, झुंडशाही, पवार पर्व संपवण्यासाठीची आपली लढाई असल्याचे शिवतारे म्हणाले.
यावेळी बोलतांना शिवतारे म्हणाले की, “केवळ जनतेची लढाई म्हणून, गुंडशाही आणि घराणेशाहीच्या विरोधात लढण्यासाठी विजय शिवतारे बापू जनतेची लढाई म्हणून यात उतरला आहे. देवाला मी सांगितलं तू आशीर्वाद दे, जनतारुपी मतदान होऊ दे, महाराष्ट्रात जो राजकीय चिखल झाला आहे. कोण कुठे जात आहे? कोण काय करत आहे. याबाबत नवीन आशा सर्वसामान्य लोकांच्या मनात झाली आहे. एक नवीन पर्याय, नवीन पर्व विजय शिवतारेंच नव्हे तर सर्वसामान्य सुरू करण्यासाठी आपण ही लढाई लढतोय हे गावागावात प्रत्येक मतदाराला सांगा. कुणाला पाडण्यासाठी किंवा कुणाला मदत करण्यासाठी नव्हे तर पवार पर्व संपवण्यासाठी, हे पवार आडनाव नाही, तर ही घराणेशाही आहे. झुंडशाही आहे, असे शिवतारे म्हणाले.
झुंडशाही, हुकूमशाही संपवण्यासाठी हे धर्मयुद्ध...
पुढे बोलतांना शिवतारे म्हणाले की, “40- 40 वर्षे यांना आम्ही का मतदान करायचं असं इतर मतदारसंघातील लोक विचारात आहे. यांना कशासाठी मतदान करायचे, शरद पवारांनी आम्हाला काय दिलं, अजित पवारांनी काय दिलं, उलट प्रचंड अत्याचार केले. पुणे जिल्ह्यात पवार सोडून दुसरे कोणी निर्माण झालं नाही पाहिजे. जिल्ह्यात दुसरे कोणी मोठं होऊ नयेत, सर्वांचे पाय कापण्याचे काम केलं. ही लढाई आम्ही जिंकण्यासाठीच लढतोय. कुणाला हरवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी नव्हे, तर पवार रुपी नावाची झुंडशाही आणि हुकूमशाही संपवण्यासाठी हे धर्मयुद्ध म्हणून मी स्वीकारले आहे. त्यामुळे कोणीही मनात शंका ठेवू नका, असे शिवतारे म्हणाले.
प्रस्थापित लोकांच्या विरोधात सर्वसामान्य माणूस पेटून उठला आहे...
"मी दौरा करत असताना एका गावात मला लोकं भेटली. अनेक लोकं माझ्या जवळ येऊन कानात सांगत होती की, बापू माघार घेऊ नका. यांची एवढी भीती आहे की, मी माघार घेऊ नये हे सांगण्यासाठी लोकांना कानात सांगावं लागतं. या प्रस्थापित लोकांच्या विरोधात सर्वसामान्य माणूस किती पेटून उठला आहे याचं हे उदाहरण आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढणार म्हणजे लढणार आणि लढणारच असे शिवतारे म्हणाले. मला जनतेचं आशीर्वाद असेल किंवा जे काही छुपं आशीर्वाद असेल ते मिळेल असेही शिवतारे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरून 12 वाजवणार! बारामतीसाठी शिवतारे ठाम, अजितदादांना घाम!