Water Storage : जून लोटला तरीही दमदार पावसाची प्रतीक्षाच! धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट, ठिकठिकाणी पेरण्या खोळंबल्या
पावसाळ्याचा जून महिना लोटला असताना विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट असून जिल्ह्यातील धरणे तहानलेलीच आहेत.
Vidarbha Weather Update : गेल्या जून महिन्यात राज्यातील बहुतांश भागांसह विदर्भात (Vidarbha) पावसाने दडी मारल्याने जल संकटाचे ढग आणखी गडद झाले आहे. विदर्भात अपेक्षेप्रमाणे अद्याप दमादर पाऊस (Rain) न पडल्याने बहुतांश जिल्ह्यातील मोठ्या धारणांची परिस्थिती जैसे थे चं आहे. एकीकडे हवामान विभागाने (IMD) विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देऊन देखील अंदाजाप्रमाणे पावसाने दांडी दिल्याने शेतकर्यांचा हिरमोड झाला आहे.
तर अनेक ठिकाणी खरीप हंगामातील पेरणीची कामे खोळंबली आहे. आजपासून पुढील पाच दिवस विदर्भात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडा अखेरीस तरी दमदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी देखील पावसाकडे नजरा लावून आहे.
तलावांचा जिल्ह्यात धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट
पावसाळ्याला सुरूवात होऊन पावसाचा जून महिना लोटला असताना विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट असून जिल्ह्यातील धरणे तहानलेलीच आहेत. अशातच गोंदिया जिल्ह्यातील बाघ-इटिया डोह प्रकल्पांतर्गत इटियाडोह धरणासह बाघ प्रकल्पाचे पुजारीटोला, कालीसराड आणि सिरपूर या मोठ्या धरणासह बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंदा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर, कटंगी आणि कलपाथरी असे 9 मध्यम प्रकल्प असून 23 लघु प्रकल्प आणि गोंदिया पाठबंधारे विभागाची 38 मामा तलाव आहेत. तर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सुमारे दीड हजार जुने मामा तलाव आहेत. त्यामुळेच तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे.
मात्र, जिल्ह्यात यावर्षीच्या कडक उन्हामुळे प्रमुख जलाशयांची पाणीपातळी झपाट्याने कमी झालीय. तर यावर्षी जून महिन्यात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील धरण, नदी आणि नाल्यांमध्ये पाणी साचले नाही. परिणामी, गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.
तर गतवर्षीच्या तुलनेत सद्यः स्थितीत प्रकल्पांमध्ये फार कमी पाणीसाठा आहे. गोंदिया जिल्ह्यात सरासरी 1245 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद होते. मात्र, गेल्या काही वर्षात पावसाची सरासरी कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. यावर्षीही जून महिना कोरडाच गेल्याने सद्यस्थितीला गोंदिया जिल्ह्यातील मुख्य जलाशयांमध्ये 17 टक्के तर मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 30 टक्के जलसाठा शिल्लक आहे. ही आकडेवारी गोंदिया जिल्हावासीयांची चिंता वाढवणारी आहे.
पावसाविना ठिकठिकाणी पेरण्या खोळंबल्या
खरीप हंगामात विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणासह वाशिम जिल्ह्यात 50 लाख 73 हजार 639 इतके सरासरी लागवड क्षेत्र आहे. 1 जुलैपर्यंत 23 लाख 32 हजार 190 हेक्टवर कापूस, सोयाबीन, धान, तूर आणि अन्य पिकांची पेरणी झाली आहे. विभागनिहाय विचार करता अमरावती विभागात सरासरी 31 लाख 58 हजार 872 हेक्टरवर पेरणी होते. यातील 16 लाख 71 हजार 697 हेक्टवर पेरणी पूर्ण झाली.
नागपूर विभागात सरासरी 19 लाख 14 हजार 767 पैकी 6 लाख 60 हजार 493 हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे. तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विदर्भातील सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या केवळ दोन टक्के धानाची रोवणी झाल्याची कृषी विभागाची नोंद आहे. धानाचे पन्हे पावसाअभावी करपू लागल्याने टँकरने पाणी देऊन पीक जगवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या