(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vasai Virar News: बोगस कागदपत्रांद्वारे बनलेल्या इमारतींचं काम बिनधास्त सुरुच; फ्लॅट्स विकून नागरिकांचीही फसवणूक, तरीही पालिका शांत?
Vasai Virar: पोलिसांनी बनावट शिक्के आणि कागदपत्रं बनावणाऱ्या टोळीला ताब्यात घेतल्यानंतरही अशा इमारतींचं काम बिनधास्त सुरुच आहे. सामान्य नागरिकांची आणखी फसवणूक होण्याची पालिका वाट बघतेय का? असा सवाल आता उपस्थित होतोय.
Vasai Virar: वसई-विरार पालिका, सिडको, जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादी कार्यालयांच्या बनावट शिक्के आणि लेटरहेड बनवणाऱ्या टोळीचा भांडाफोड विरार पोलिसांनी केल्यानंतर आता याची व्याप्ती वाढत जात आहे. बोगस कागदपत्रांद्वारे अनधिकृत इमारती (Unauthorized Buildings) बनत असताना पालिका झोपली आहे का? असा संतप्त सवाल नागरीक विचारत आहेत. एवढं होवूनही आजही वसई-विरार शहरात बिनधास्तपणे अनधिकृत बांधकामं सुरु असल्यामुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
वसई-विरारमध्ये बोगस इमारतींची व्याप्ती
बनावट शिक्के आणि लेटरहेडद्वारे 55 इमारतींनी बोगस कागदपत्रं बनवून पालिकेच्या अवैध परवानग्या देखील घेतल्या होत्या, विरार पोलिसांच्या तपासात हे उघड झालं आहे. मात्र पालिका स्थापन झाल्यापासून अशा अनेक बोगस परवानग्यांद्वारे इमारती उभ्या राहिल्या असल्याचा खळबळजनक आरोप समाजसेवक टॅरेन्स हॉन्ड्रीक्सी यांनी केला आहे. त्यांनी अनधिकृत बांधकामांबाबत सर्वात प्रथम मुंबई उच्च न्यायलयाचे दार ठोठावलं होतं.
जवळपास 10 लाखांहून अधिक इमारती बोगस असल्याचा दावा
पालिकेने वसई-विरार क्षेत्रात केवळ 2 हजार 800 अनधिकृत बांधकामे असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला दिली होती. मात्र टॅरेन्सच्या मते ही बोगस इमारतींची व्याप्ती 10 लाखांच्या वरती आहे. असं असताना बिनधास्तपणे आजही अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या आर्थिक मदतीने बांधकामं होत आहेत आणि नागरीक फसत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बोगस इमारतींतील फ्लॅट्सची विक्री सुरुच
ज्या 55 इमारती बोगस कागदपत्रांद्वारे बांधल्या जात आहेत, त्याबद्दल तक्रार होऊनही त्या इमारतीतील फ्लॅट आजही विकले जात आहेत. इमारतीची तक्रार झाल्यानंतरही येथील बांधकाम व्यावसायिक आजही बिनधास्तपणे इमारती बनवत आहेत आणि एक फ्लॅट 25 लाखांना विकत आहेत, या इमारतींवर लोन देखील ते करुन देत आहेत. आता पालिका अशा फसव्या बांधकाम व्यावसायिकांकडून किती नागरीक फसवले जावे याची वाट बघत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विरार पूर्वेकडील अण्णा पाडा, जीवदानी रोड येथील आनंदी नगर या परिसरात बोगस इमारती सर्रास बांधल्या जात आहेत.
नागरिकांची फसवणूक, चिंता वाढली
सध्या विरारमध्ये बोगस डॉक्युमेंटद्वारे बनलेल्या इमारतींमध्ये घरं घेतलेल्या रहिवाशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मोल मजूरी करुन, पै नी पै जमा केलेल्या पैशातून इमारतीमध्ये घर घेतलं आणि बिल्डर्सनी फसवल्यामुळे सध्या या इमारतीतील रहिवाशांवर जगावं की मरावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपली इमारत बोगस डॉक्युमेंटद्वारे बनवली गेल्याचं समजल्यावर येथील रहिवाशांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. येथील सर्व रहिवासी सामान्य कुटुंबातील आहेत. मोल मजूरी करुन, पै नी पै जमा करुन त्यांनी आपलं हक्काच घर घेतलं. सुरुवातीला इमारतीचे बोगस डॉक्युमेंट दाखवून, नागरिकांना फसवून रुम विकल्या गेल्या. नागरीकांनी विश्वास ठेवून रुम घेतले. आता बोगस इमारत पालिका तोडणार या भीतीने नागरिकांना आपल्या घराची चिंता सतावत आहे.
100 हून अधिक इमारतींची तक्रार, मात्र केवळ 4 इमारतींवर गुन्हा
वसई-विरार शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय बनत नसतील, यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. विरार पोलिसांनी पालिकेला आतापर्यंत विरार पूर्वेकडील 100 पेक्षा जास्त इमारती बोगस डॉक्युमेंटद्वारे उभ्या झाल्या असल्याची लेखी माहिती दिली आहे. मात्र आतापर्यंत फक्त चार इमारतींच्या बिल्डर्सवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेच्या भूमिकेबद्दल नेहमी प्रश्नचिन्ह उभं राहत आहे.
हेही वाचा: