वसई-विरार पालिकेचा प्रताप, चाळ माफियांना वाचवण्यासाठी मृत महिलेच्या नावावर गुन्हा दाखल
Vasai Municipal Corporation : वसई-विरार महानगरपालिकेने चक्क मृत महिलेच्या नावावर गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे. ज्या महिलेच्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ती महिला 2009 ला मयत झाली आहे.
मुंबई : वसई-विरार महानगरपालिकेने (Vasai Municipal Corporation) चाळ माफियाना वाचवण्यासाठी चक्क मृत महिलेच्या नावावर गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे. या प्रतापामुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्निचिव्ह उपस्थित केले जात आहे. ज्या महिलेच्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ती महिला 2009 ला मयत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
राजवली दुर्घटनेत पालिकेच्या प्रभारी आयुक्तांनी दोन गुन्हे दाखल केले होते. यात एम.आर.टी.पीचा देखील गुन्हा दाखल केला आहे. परंतु, ज्या जमीन मालकावर गुन्हा दाखल केला आहे. ती महिला 2009 ला मयत झाल्याचं समोर आलं आहे. पालिकेने तेथील रुम विकत घेणाऱ्यांच्या करारावरून नावे टाकली असल्याचे सांगितले आहे.
वसईच्या राजीवली येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घनेत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. पालिकेच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त नीलम निजाई यांनी वालीव पोलीस ठाण्यात केलेल्या दोन तक्रारीत जमिनीच्या मालक मेरी फेलिक्स ग्रेसिअस यांच्यावर कलम 304 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर मेरी यांच्या नावावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या नातेवाईकांना धक्काच बसला. कारण मेरी ग्रेसिअस यांचा तेरा वर्षांपूर्वी म्हणजे 30 सप्टेंबर 2009 रोजी मृत्यू झाला आहे. ज्या सर्व्हे नंबर 140 मध्ये ही दुर्घटना घडली त्या जमिनीचा सातबारावर एक नाही तर तब्बल 70 नावे आहेत.
सातबाऱ्यावरील मेरी फेलिक्स ग्रेसिअस यांचं नाव 22 व्या नंबरवर आहे. तरी देखील त्यांचं नाव एफआयआर मध्ये टाकण्यात आलं आहे. याबाबत नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आमच्या जागेवर होणाऱ्या उत्खन्नाबाबात आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाने यावर कोणतीच दखल घेतली नसल्याची माहिती दिली आहे.
"रुम विकत घेणाऱ्यांकडून जी अँग्रीमेंटची कॉपी मिळाली त्यावरील नावावरुन ही नावे एफआयआरमध्ये टाकण्यात आली आहेत. याबाबत तक्रार केली असून, पोलीस तपास करत आहेत. पोलिसांच्या तपासात यात जे दोशी असतील त्यांची नावे समोर येतील अशी माहिती निलम निजाई यांनी दिली.
चाळ माफियांना पालिका वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. वेळोवेळी याबाबत आम्ही पालिकेला तक्रारी केल्या होत्या. तरीही कारवाई होत नव्हती. त्यामुळे पालिकेच्या विरोधात आता आम्ही आक्रमक आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी दिली.