वाढदिवसाच्या दिवशी वडापाव, केंद्रातील मराठी अधिकाऱ्यांची नामी संकल्पना
Vadapav In Delhi: महाराष्ट्रात, खासकरून मुंबईमध्ये, वडापाव खाल्ला नाही अशी व्यक्ती दुर्मिळ.
Vadapav In Delhi: महाराष्ट्रात, खासकरून मुंबईमध्ये, वडापाव खाल्ला नाही अशी व्यक्ती दुर्मिळ. याशिवाय महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा मराठी किंवा अमराठी व्यक्ती, जी मुंबईत राहून जाते. तेव्हा तिला वारंवार या वडापावची आठवण येते आणि मग मुंबईत आल्यावर आठवणींनी वडापाव खाल्ला जातो.
नवी दिल्लीमध्ये केंद्र शासनाच्या सेवेत उच्च पदांवर मराठी अधिकारी आहेत. त्यांचा दिल्लीमध्ये एक सांस्कृतीक आणि कला, साहित्य संबंधित गट आहे. त्याचं नाव पुढचे पाऊल आहे. या गटाने आपली ही वडापाव खाण्याची हौस भागविण्यासाठी एक नामी संकल्पना 1 जानेवारी 2022 पासून सुरू केली आहे. अधिकाऱ्यांच्या वाढदिवशी त्यांना ग्रीटींग कार्ड किंवा पुष्पगुच्छ न देता त्यांना वडापाव देण्यात येताे. या संकल्पनेचे नावच 'वाढदिवसाच्या दिवशी वडापाव', असे आहे.
सध्याच्या आयटी बेस सर्विसेस आणि ऑनलाइन ऑर्डर घेऊन डिलिव्हरी करणाऱ्या संस्थांमुळे, हे सहज शक्य झाले आहे. तसेच हे अधिकारी दिल्लीत राहून, नंतर पुन्हा देशाच्या इतर भागात पोस्टिंग वर जातात. त्यांना त्यांच्या गावात, शहरात वाढदिवसाच्या दिवशी वडापाव पोहोचवण्याचे सुद्धा प्रयत्न केले गेले आणि ते यशस्वी पण झालेत.
आपल्या देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये वडापाव मिळतो. पण बरेचदा आपल्याला तो कुठे मिळतो, हे माहित नसतं. याठिकाणी सध्याच्या ऑनलाईन ऑर्डर घेणाऱ्या कंपन्या मदतीला धावल्या. या कंपन्यांमुळे तुम्ही ज्या शहरात वास्तव्याला आहे. त्याच्या आसपास मराठी खाद्य किंवा वडापाव कुठे उपलब्ध आहे आणि कशा गुणवत्तेचा आहे. किती वेळात आपल्यापर्यंत पोहोचू शकेल, याची माहिती मिळते. त्यांना ऑनलाईन ऑर्डर दिली आणि कुठे पोचवायचा आहे, हे कळलं त्याप्रमाणे साधारण एक तासाच्या आत या कंपन्या ऑर्डर आपल्या इप्सित स्थळी पोहोचवतात.
याबद्दल बोलताना पुढचे पाऊलचे अध्यक्ष प्रफुल्ल पाठक, ज्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली, रुजवली, त्यांनी सांगितलं, "आपल्याला महाराष्ट्रीयन पदार्थ जर महाराष्ट्रबाहेर मिळाले तर अतिशय आनंद होतो आणि आता ते बऱ्यापैकी शक्य पण झालं आहे. शिवाय या निमित्ताने मराठी व अमराठी व्यक्ती आपल्या या मराठी पदार्थांची ऑर्डर वास्तव्याच्या ठिकाणी वाढवेल, तर त्याप्रमाणे त्या ठिकाणी हे मराठी पदार्थ जास्ती विकल्या जातात. त्याची डिमांड आहे. म्हणून तसे आऊटलेट्स तयार होतील. आपल्याला आपले मराठी पदार्थ जर देशभर पॉपुलर करायचे असतील, तर आपण अशा प्रकारे शोध घेऊन ते पदार्थ आपल्या नातेवाईक मित्रमंडळी यांना वाढदिवसाच्या दिवशी पोचवले तर आपोआपच त्या पदार्थांबद्दल लोकांना आवड निर्माण होईल आणि आपल्या हव्या त्या ठिकाणी मिळतात याची खात्री होईल आणि मराठी पदार्थांना चालना मिळेल."
या संकल्पनेतून आणि पुष्पगुच्छ, ग्रिटिंग देण्याऐवजी आपल्या आवडीचा पदार्थ, वाढदिवस ज्यांचा आहे, त्यांच्या आवडीचा पदार्थ आपल्याला त्यांच्या घरपोच पोचवण्याची सोय आहे. या निमित्ताने आपण मराठी पदार्थना देशातच नाही, तर जिथे-जिथे वडापाव सारखे पदार्थ आवडणारे व्यक्ती राहतात आणि असे पदार्थ बनवणारे आऊटलेट्स आहेत, तिथे या संकल्पनेचा वापर करून मराठी पदार्थांना बाजारपेठ मिळवून देऊ शकतो. सोबत कुठेही मराठी पदार्थ खाण्याची सोय होईल, असे पाठक यांनी सांगितलं.