राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा धुमाकूळ; मदतीच्या प्रतीक्षेतील बळीराजाची पुन्हा दैना, फळबागांवर विपरित परिणाम
Unseasonal rain : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.
Unseasonal rain all over the maharashtra : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातल्याने बळीराजाची (Farmers) अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाला आंबा, काजू, आंबा गळून पडला आहे. द्राक्षांच्या बागावरही विपरित परिणाण झाला आहे. त्यामुळे यापूर्वी झालेल्या अवकाळीने प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची पुन्हा दैना झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. तळकोकणात आज (7 एप्रिल) आणि उद्या (8 एप्रिल) अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हवेतील विसंगतीमुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशपासून ते विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत परिणाम झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्याचाच परिणाम आज राज्यात सर्वत्र दिसून आला. राज्यभरात उकाडा जाणवत असताना दुपारपासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.
कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्याला झोडपले
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वळीव पावसाने चांगलेच धुमशान घातले. वीजाच्या गडगडाटांसह पाऊस झाला. आज सकाळपासून वातावरण प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे दुपारी आलेल्या पावसाने काहीसा गारवा मिळाला, पण आजरा शहरातील आठवडी बाजारावर पाणी फेरले. दरम्यान, तालुक्यातील हत्तीवडे वीज पडून वीटभट्टीवर काम करणारी मजूर महिला जखमी झाली. अनसाबाई श्रीकांत चव्हाण (वय 36, मुळगाव अलिबाद, जि. विजापूर कर्नाटक) असे जखमी महिलेचे नाव आहे.दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट व मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाने आजर्याचा आठवडा बाजार ही दुपारीच संपला. वाऱ्यामुळे पिकलेल्या काजूसह ओला काजू व मोहोरही पडला आहे.
सातारमध्ये अवकाळी पाऊस
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर पाठोपाठ सातारा, मेढा, जावली या भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
विदर्भात वर्धा, अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस
वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुलगाव परिसरातील काही भागात पावसासह गारपीट झाली. जवळपास अर्धा तास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पुलगाव परिसरात काही ठिकाणी पावसादरम्यान एक ते दोन मिनिट बोराच्या आकाराची गार कोसळली. विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वार्यासह पाऊस झाला. जिल्ह्यात काही ठिकाणी दोन दिवस वादळी वार्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
अकोल्यात जिल्ह्यातही हजेरी
आज दुपारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात पावसामुळे पातूर आणि बाळापुरात मोठं नुकसान झालं आहे. गारपिटीने संत्रा, भाजीपाला, गहू आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पातूर तालूक्यातील बेलूरा गावातील नाल्याला ऐन उन्हाळ्यात पुर आला. या अवकाळी पावसामुळे अकोला बाजार समितीत शेतमालाचं नुकसान झालं. बाजार समितीत सध्या विकण्यासाठी आलेला हरभरा आणि गहू या पावसामुळे भिजला. अकोला बाजार समितीत माल साठविण्यासाठी शेड कमी पडत असल्याने अनेकदा पावसामुळे शेतमालाचं नुकसान होत आहे.
तळकोकणात अवकाळी पाऊस
दरम्यान, तळकोकणातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. आंबोली, सिंधुदुर्ग, चौकुळ, गेळे परिसरात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे आंबा, काजूसह जाभुळ पिकाला फटका बसला आहे.
बेळगाव शहरात वळीव पावसाने हजेरी
जिल्ह्यात विजांचा गडगडाट होऊन पावसाला प्रारंभ झाला. अचानक सुरु झालेल्या पावसाने खरेदीसाठी बाजारात आलेल्या लोकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना देखील आपले साहित्य सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी आसरा शोधावा लागला.
इतर महत्वाच्या बातम्या