केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा भोवळ, सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमातील घटना
नितीन गडकरी यांना पुन्हा भोवळ आली आहे. सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात समारोपाच्या वेळी राष्ट्रगीत सुरु असताना भोवळ आली.
सोलापूर : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा भोवळ आली आहे. सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात समारोपाच्या वेळी राष्ट्रगीत सुरु असताना त्यांना भोवळ आली. राष्ट्रगीत सुरु असताना गडकरी अचानक खाली बसले आणि पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मंचावर सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु उपस्थित होते. लगेचच गडकरींना पाणी आणि औषध देण्यात आलं. सध्या नितीन गडकरींची प्रकृती स्थीर आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर गडकरींना आपले नियोजित सर्व दौरे रद्द केले आहेत. गडकरी आज सोलापूर, सांगली दौऱ्यावर होते.
याआधी डिसेंबर महिन्यात अहमदनगरच्या राहुरीमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभात नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. गडकरी यांच्या भाषणानंतर राष्ट्रगीत सुरु असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी नितीन गडकरींना सावरलं.
त्यानंतर लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान शिर्डीतील सभेत नितीन गडकरींना चक्कर आली होती. उष्णतेचा त्रास त्यावेळी गडकरी यांना झाला होता आणि ते अचानक खाली बसले होते.