Uddhav Thackeray : ठाकरेंची तोफ धडाडणार! उद्यापासून पोहरादेवीतून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात, पक्षाची मोट बांधणार
Uddhav Thackeray Poharadevi Visit : राज्यात बंजारा समाजाची असलेली मतदारसंख्या आणि बंजारा समाजातील पोहरादेवीचं असलेलं अनन्यसाधारण स्थान यादृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे.
Uddhav Thackeray Maharashtra Daura : शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा महाराष्ट्र दौरा (Uddhav Thackeray Maharashtra Tour) उद्यापासून सुरू होत आहे. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी (Poharadevi) येथून या दौऱ्याची सुरूवात होतं आहे. शिवसेना पक्षात पडलेली उभी फूट आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पोहरादेवीत येणार आहेत. पक्षातील फुटीनंतर शिंदे गटात गेलेले संजय राठोड आणि भावना गवळी यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. राज्यात बंजारा समाजाची असलेली मतदारसंख्या आणि बंजारा समाजातील पोहरादेवीचं असलेलं अनन्यसाधारण स्थान यादृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. निवडणुकीच्या दृष्टीने बंजारा समाजाची बोट बँक मोलाची ठरु शकते. अलिकडे शिंदे-फडणवीस सरकारने बंजारा समाजासाठी निधी जाहीर केला आहे.
पोहरादेवीपासून उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात
पोहरादेवी... बंजारा समाजाची काशी... वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालूक्यातील हे स्थान बंजारा समाजासाठी (Banjara Community) सर्वोच्च आस्थेचं धर्मस्थळ आहे. बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संत श्री. सेवालाल महाराजांची समाधी येथे आहे. यासोबतच समस्त बंजारा समाजाची कुलदेवता जगदंबा मातेचं मंदिर पोहरादेवीत आहे. राज्यात बंजारा समाजाची लोकसंख्या जवळपास दीड कोटींच्या आसपास आहे. त्यात बंजारा मतदारांची संख्या सुमारे 75 लाखांच्या वर आहे. त्यामुळेच राज्यातील सर्वच राजकीय पक्ष बंजारा व्होटबँक आपलीशी करण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरूवात पोहरादेवीपासून करणार आहेत.
बंडखोर आणि भाजप विरोधात उद्धव ठाकरे मैदानात
राज्यात मागच्या वर्षी जून महिन्यात झालेल्या राजकीय उलथापालथीत संजय राठोड यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंना साथ दिली. यासोबतच यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळींनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. उद्धव ठाकरे यांचं पोहरादेवीत येणं या दोघांनाही ठाकरे गटाचा राजकीय इशारा असल्याचं म्हटलं जात आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून राज्यासह देशभरातील बंजारा समाजात आपली मांड घट्ट करण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे. 2018 मध्ये पोहरादेवीत नंगारा भवनाच्या भूमिपुजनासाठी उद्धव ठाकरे पोहरादेवीत आले होते. त्यानंतर वर्षभरातच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. त्यामुळेच उद्धव ठाकरेंची पोहरादेवीवर असलेली आस्था राजकारणापलिकडची असल्याचं बोललं जातं. या दृष्टीने हा दौरा फार महत्त्वाचा ठरणार आहे.
सध्या विधीमंडळात (विधानसभा आणि विधानपरिषद) असलेले बंजारा समाजाचे लोकप्रतिनिधी :
विधानसभा :
1) संजय राठोड : दिग्रस, जि. यवतमाळ : शिंदे गट
2) इंद्रनील नाईक : पुसद, जि. यवतमाळ : राष्ट्रवादी
3) तुषार राठोड : मुखेड, नांदेड : भाजप
विधान परिषद :
1) निलय नाईक : यवतमाळ : भाजप
2) राजेश राठोड : जालना : काँग्रेस
देशभरात बंजारा समाजाची लोकसंख्या 19 कोटींच्या जवळपास आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, राजस्थान आणि तामिळनाडू राज्यात हा समाज मोठ्या प्रमाणात आहे. देशभरात लोकसभेच्या किमान 45 जागांवर हा समाज निर्णायक आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या किमान 10 आणि विधानसभेच्या 60 जागांवर बंजारा समाजाची मतं निर्णायक आहेत. त्यामुळेच बंजारा समाज आणि राजकारणात मोठं महत्व असलेल्या पोहरादेवी धर्मपीठाच्या आशीर्वादासाठी सर्वच राजकीय पक्षांचा आटापीटा सुरू आहे.
राज्यातील बंजारा व्होटबँक असलेले लोकसभा मतदारसंघ :
यवतमाळ-वाशिम, अकोला, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, औरंगाबाद, सोलापूर, माढा, ठाणे
उद्धव ठाकरे काय बोलणार?
गेल्या काही वर्षांत बंजारा समाज आणि त्यानुषंगाने होत असलेलं राजकारण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. उद्या पोहरादेवीतून उद्धव ठाकरे कोणता राजकीय संदेश देतात यावरून त्यांच्या पुढच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे. भाजप, शिंदेंच्या शिवसेनेनंतर आता उद्धव ठाकरेंनीही बंजारा समाजाला आपलं करण्याच्या या प्रयत्नाला बंजारा समाज आणि मतदार कसा प्रतिसाद देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.