कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र राज्यात कधी येणार? तिथले लोक हिंदू नाहीत का? : उद्धव ठाकरे
राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेळगाव सीमा प्रश्नावर भाष्य केले. यावेळी ठाकरे यांनी भाजपला धारेवर धरलं.
नागपूर : विधानसभेच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात भाजपला धारेवर धरलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकार देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करुन इतर देशातील हिंदूंसाठी इथले दरवाजे उघडत आहे. त्याला आमचा विरोध नाही. काश्मिरी हिंदू पहिल्यांदा भारतात आले तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आसरा दिला होता. परंतु इतर देशातले जे हिंदू भारतात येतील, त्यांची काळजी कोण वाहणार आहे? भाजप जसा इतर देशातल्या हिंदूंचा विचार करत आहे. तसा बेळगावातल्या हिंदूंचा विचार करणार का? असे अनेक सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बेळगाव, कारवार, निपाणीसह इतर भागातील हिंदूंच्या प्रश्नांचं काय? बेळगावातले लोक हिंदू नाहीत का? बेळगावातले मराठी बांधव आक्रोश करत आहेत. त्यांना महाराष्ट्रात यायचं आहे. हा प्रश्न कधी सुटणार. कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री भाजप नेते येडीयुरप्पा यांनी नुकतेच तिथे बहुमत सिद्ध केलं आहे. त्यामुळे भाजपने पुढाकार घेऊन बेळगाव प्रश्न सोडवावा.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बेळगावातल्या मराठी भाषिकांवर अत्याचार होत आहेत. त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी, कर्नाटव्याप्त महाराष्ट्राला सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी एकत्र यायला हवं. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र त्यांच्या मुठीतून सोडवायला हवा. तो महाराष्ट्राचा भूभाग आहे. महाराष्ट्रात आणायला हवा.
मुख्यमंत्री म्हणाले की, बेळगाव प्रश्न सध्या कोर्टात अडकला आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारने पालकाची भूमिका घ्यायला हवी. परंतु केंद्रातल्या भाजप सरकारने गेल्या काही वर्षात सातत्याने केवळ कर्नाटकची बाजू घेतली आहे. मराठी भाषिकांचा मुद्दा मांडल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी बेळगावची महापालिका बरखास्त केली. हे चित्र पाहिल्यानंतर प्रश्न निर्माण होतो की, बेळगाव भारतात आहे की पाकिस्तानात? इथलं सरकार देशातल्या हिंदूंना न्याय देऊ शकत नाही आणि हेच लोक बाहेरच्यांना इथे आणायला निघाले आहेत.
पाहा उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण