सांगलीत विना परवाना बैलगाडी शर्यतीचा प्रकार; बैलांना अमानुषपणे बॅटरीचा शॉक आणि काठीने मारहाण
अलीकडच्या काळात सांगली जिल्ह्यात प्राण्यांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्या जर वेळेत नाही थांबवल्या तर भविष्यात त्याचे रूपांतर मानवी अत्याचारापर्यंत जाईल यात शंका नाही. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाड्या शर्यतींवर बंधी घातली असून देखील जिल्हात वारंवार शर्यती आयोजित केल्या जातात.
सांगली : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात अलकुड येथे विना परवाना बैलगाडी शर्यती भरवण्यात आल्या होत्या. शर्यतीवर बंदी असताना सुद्धा या शर्यती भरवल्या गेल्या होत्या. यावेळी बैलगाडी पळवताना बैलांना अमानुषपणे बॅटरीचा शॉक आणि काठीने मारहाण करण्यात आली होती. हा प्रकार प्राणी मित्र अशोक लकडे यांनी समोर आणला आहे. प्राणी मित्रांनी पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केली आहे. तर याप्रकरणी मनेका गांधी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन देऊन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्राणी मित्र करणार आहेत.
अलीकडच्या काळात सांगली जिल्ह्यात प्राण्यांवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्या जर वेळेत नाही थांबवल्या तर भविष्यात त्याचे रूपांतर मानवी अत्याचारापर्यंत जाईल यात शंका नाही. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाड्या शर्यतींवर बंधी घातली असून देखील जिल्हात वारंवार शर्यती आयोजित केल्या जातात. काही वेळा तक्रार करून देखील पोलीस वेळेत पोहचू शकत नाहीत. बऱ्याच ठिकाणी पोलीस पोहचून देखील त्यांच्या वरती कोणतेही गुन्हे दाखल न करता त्यांना तेथून फक्त हाकलून लावतात. याचाच गैरफायदा घेऊन शर्यतीचे आयोजक हल्ली पोलिसांना न जुमानता जिल्ह्यात शर्यत आयोजित करत असतात, शिवाय त्यांना राजकीय पाठबळ असल्याने पोलीस ही कारवाई करण्यास टाळाटाळ करत असतात.
2016 साली तत्कालीन कलेटर यांनी घोडा आणि बैल यांच्यावर होत असलेले अत्याचार थांबावे म्हणून घोडा बैल एकाच गाडीस जुंपण्यास बंधी घातली होती. तो आदेश देखील धूळ खात पडलेला आहे. शर्यतींमध्ये बैलांना चाबकाने, मोठ्या काठीने अमानुष मारणे, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणे, शेपूट चावणे, असे अनेक प्रकार करून अत्याचार केले जातात. हे वेळीच थांबावे म्हणून जिल्ह्यातील प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, अशी मागणी प्राणी मित्र करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :