Pandharpur By Election : राष्ट्रवादीकडून भालकेंच्या परिवारातून उमेदवारी निश्चित तर भाजपकडून 'हे' चौघे इच्छुक
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या 23 मार्चपासून अर्ज दाखल करण्याची सुरुवात होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी 13 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या 23 मार्चपासून अर्ज दाखल करण्याची सुरुवात होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी 13 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके अथवा पुत्र भगीरथ भालके यांच्यापैकी एक नाव निश्चित केले जाणार असल्याची माहिती आहे. मात्र दुसरीकडे भाजपकडून मात्र चार उमेदवार इच्छुक असल्याची माहिती आहे.
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून चौघे इच्छुक
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून चार उमेदवार इच्छुक असल्याची माहिती सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रमुख बाळाभाऊ भेगडे यांनी दिली. विधान परिषदेचे विद्यमान आमदार प्रशांत परिचारक, उद्योजक समाधान अवताडे , उद्योजक अभिजित पाटील आणि स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य बब्रुवान रोंगे हे चौघे भाजपकडून पोटनिवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती भेगडे यांनी दिली. याबाबत आता भाजपाची प्रदेश पार्लमेंटरी बोर्ड या उमेदवाराची यादी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे उमेदवार यादी पाठवणार असल्याचे बाळा भेगडे यांनी सांगितले. भेगडे व सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी इच्छुक उमेदवारांबाबत माध्यमांना माहिती देताना या चौघातील एक उमेदवार येत्या चार दिवसात जाहीर होईल असे सांगितले.
अजित पवारांचा पंढरपूर दौरा, कोरोना नियमांचे तीन तेरा! राष्ट्रवादीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल
राष्ट्रवादीकडून भालकेंच्या पत्नी किंवा मुलाला उमेदवारी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके अथवा पुत्र भगीरथ भालके यांच्यापैकी एक नाव निश्चित केले जाणार असल्याची शक्यता आहे. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडून एका गटाने भालके परिवारात उमेदवारी देण्यास विरोध केल्याने अजित पवार यांना पंढरपूरला यावे लागले. सध्या राष्ट्रवादीकडे उमेदवार मागणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी दिवंगत आमदार भारत भालके यांच्याबाबत गोरगरीब मतदारांत असलेली सहानुभूतीचा विचार करता राष्ट्रवादीकडून भालके यांच्या परिवारातच उमेदवारी देण्याची मानसिकता दिसत आहे. त्यानुसार पक्षाकडून भालके यांच्या पत्नी जयश्रीताई यांचे नाव नक्की करण्याची तयारी सुरु असताना भालके समर्थकांना मात्र त्याजागी भालके यांचे पुत्र भगीरथ भालके याना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा आहे. भालके यांच्या पत्नी राजकारणापासून कायमच दूर राहत त्यांनी कुटुंबाकडे आजवर जास्त लक्ष दिले होते. अशावेळी त्यांना उमेदवारी दिल्यास पराभवाची भीती भालके समर्थकांना वाटते. याउलट भगीरथ भालके यांची नुकतीच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदावर निवड झाल्यापासून त्यांनी मंगळवेढा व पंढरपूर या दोन्ही तालुक्यात गावभेटी करून वातावरण तयार केले आहे. मतदारसंघाचा पहिला दौराही त्यांचा आत्तापर्यंत पूर्ण झाल्याने भगीरथ यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीला चांगला विजय मिळेल अशी भालके समर्थकांची भूमिका आहे.