एक्स्प्लोर
नगरला एका महिन्यात दुसरं दुहेरी हत्याकांड, जामखेड बंदची हाक
मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवल्यावर पालकमंत्री राम शिंदे रुग्णालयात आले. मात्र संतप्त जमावाच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं.
अहमदनगर : अहमदनगरमधल्या गोळीबाराचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. जामखेडमध्ये गोळीबार करुन योगेश आणि राकेश राळेभात या भावांची हत्या करण्यात आली. योगेश राळेभात हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटनेचा जिल्हा सरचिटणीस होता.
दोन्ही जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र वैद्यकीय उपचार उशिरा झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. यानंतर जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर नातेवाईकांना आक्रोश केला.
मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवल्यावर पालकमंत्री राम शिंदे रुग्णालयात आले. मात्र संतप्त जमावाच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं. यावेळी जमावाने अर्वाच्च्य भाषा करत घोषणाबाजी केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर पालकमंत्र्यांनी रुग्णालयाच्या मागील दाराने काढता पाय घेतला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याला रवाना करण्यात आले आहेत. गोळीबार कोणी आणि का केला याबाबतचा तपास सुरु आहे. फॉरेन्सिकने नमुने घेतले आहेत.
दरम्यान, दुहेरी हत्याकांड प्रकरणी रविवारी जामखेड बंद पुकारण्यात आला आहे. अंत्यविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आणि पदाधिकारी हजेरी लावणार आहेत.
पूर्व वैमनस्यातून ही हत्या केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांना घटनेचे काही धागेदोरेही सापडल्याची माहिती आहे. शिवाय दुपारपर्यंत एखाद्या आरोपीला अटकही केली जाऊ शकते. मात्र पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
एका महिन्यात दुसरं हत्याकांड
अहमदनगरला हत्याकांडाचं सत्र काही थांबताना दिसत नाही. एका महिन्यात दुसर्यांदा दुहेरी हत्याकांड झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केडगाव पाठोपाठ आता जामखेडला अज्ञातांनी राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या दुहेरी हत्याकांडाने नगर पुन्हा हादरुन गेलं आहे.
गोळीबारात राष्ट्रवादी युवकचा जिल्हा सरचिटणीस योगेश आणि राकेश राळेभात यांचा मृत्यू झाला. मृत दोघेही चुलत भाऊ होते. नगरला खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला.
जामखेड मार्केट यार्डला काल साधारणपणे पावणे सात वाजता योगेश आणि राकेश हॉटेलमध्ये बसले होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी दोघांनी खाली उतरुन समोरासमोर बेछूट गोळीबार केला.
सात ते आठ गोळ्या छातीत झाडल्याने गंभीर दुखापत होऊन योगेश आणि राकेश खाली कोसळले. शेजारीच लग्नाच्या डिजेचा दणदणाट असल्याने गोंधळातच गर्दीत गोळ्या झाडल्या. यावेळी काही नागरिकांनी दुचाकीस्वारांना रोखण्याचा प्रयत्न करताच हवेत गोळ्या झाडून मारेकरी फरार झाले.
मारेकऱ्यांनी तोंडाला कापड गुंडाळल्याने त्यांची ओळख पटली नाही. गोळीबारानंतर नागरिक सैरभैर पळाल्याने गोंधळात भरच पडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement