Mumbai Goa Parshuram Ghat: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट उद्यापासून 24 तास वाहतुकीसाठी खुला, पण पावसाळ्यात हाल?
Mumbai Goa Parshuram Ghat: मुंबई-गोवा महामार्गावरील परशूराम घाटातील वाहतूक उद्यापासून 24 तास सुरू करण्यात येणार आहे.
![Mumbai Goa Parshuram Ghat: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट उद्यापासून 24 तास वाहतुकीसाठी खुला, पण पावसाळ्यात हाल? traffic resume for 24 hours from Parshuram Ghat Mumbai Goa highway from tomorrow 11st May 2023 Mumbai Goa Parshuram Ghat: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट उद्यापासून 24 तास वाहतुकीसाठी खुला, पण पावसाळ्यात हाल?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/76c2bcfeb4c2db10ef06dd1524c0d4711683732324244290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Goa Parshuram Ghat: मुंबई-गोवा महामार्गावरून (Mumbai-Goa Highway News) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्यापासून, गुरुवार 11 मे पासून मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट 24 तास वाहतुकीसाठी खुला होणार आहे. 25 एप्रिल 2023 पासून परशुराम घाटातील (Parshuram Ghat) वाहतूक दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम महत्त्वाच्या टप्प्यावर आलं असल्यानं पावसाळ्यापूर्वी धोकायदायक स्थितीत असलेलं शिल्लक काम मार्गी लावण्यासाठी 25 एप्रिल ते 10 मे अशा 16 दिवसांसाठी दुपारी 12 ते सायंकाळी 5:00 या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात आला होता. बंद कालावधी हलक्या वाहनांची पर्यायी वाहतूक कळंबस्ते-आंबडस-चीरणी मार्गे वळवण्यात आली होती. या कालावधीत येथून सुटणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या सुमारे शंभरहून अधिक बसेसवर याचा परिणाम झाला होता.
फक्त 40 टक्के काम पूर्ण
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या परशुराम घाटाचं चौपदरीकरणाचं काम गेली दोन वर्ष युद्ध पातळीवर सुरू आहे. मागील 15 दिवस घाटातील महामार्गाचे रुंदीकरणासाठी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या 16 दिवसात ठेकेदाराकडून फक्त 40 टक्केच काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्याआधी घाटातील रुंदीकरण पूर्ण करायचं होतं. पण हे काम अपूर्ण राहिले आहे.
त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी ही पावसाळ्यात अर्धवट स्थितीत असलेला घाट प्रवाशांसाठी त्रासदायक ठरु शकतो.
रुंदीकरणाच्या ठेकेदार कंपनीनं पावसाळ्यापूर्वी या घाटातील रुंदीकरण आणि उर्वरित कामं पूर्ण व्हावी यासाठी या घाटातील वाहतूक काही दिवस बंद करण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली तर ही मागणी मान्य करून येत्या 25 एप्रिल ते दहा मेपर्यंत हा घाट, या घाटातील वाहतूक ठराविक वेळेत दुपारी 12 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्णतः बंद करण्यात आला होता. मात्र, 40 टक्केच काम झाल्याने प्रवाशांचे पावसाळ्यात हाल होण्याची शक्यता आहे.
परशुराम घाटाचा अवघड टप्पा
महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण टप्प्यातील परशूराम घाट हा अत्यंत अवघड टप्पा आहे. एकीकडे 22 मीटर उंचीचा डोंगर उतार आहे. तर, दुसरीकडे घाटाच्या पायथ्याशी पेढेगाव वसलेले आहे. त्यामुळे येथे डोंगर खोदकामाशिवाय, अन्य कामे करणे अवघड असतानाही एक मोठे आव्हान स्वीकारण्यात आले. वर्षभरापूर्वी याच घाटात डोंगर फोडत असताना पोकलेन दरडीखाली सापडली. या अपघातात एका चालकाचा मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर वेळोवेळी खबरदारी घेऊन काम सुरू ठेवण्यात आले. सर्वप्रथम पायतालगत असलेले गाव सुरक्षित करण्यासाठी उताराच्या बाजूने संरक्षण भिंत उभारण्यात आली. पहिल्या टप्प्यातील 450 मीटर लांबीची आणि दुसऱ्या सुमारे दहा मीटर उंचीच्या संरक्षित भिंतीचे काम पूर्ण केले. या भिंतीमुळे डोंगराच्या खालील रस्ता सुरक्षित झाला. मात्र आता घाटात अतिशय धोकादायक टप्पा मानला जाणाऱ्या दरडीच्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)