Konkan Ganeshotsav Special Trains : मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅफिक जॅम, स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेची वाहतूकही कोलमडली
Mumbai Goa Highway : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरसलग दुसऱ्या दिवशी ट्रॅफिक जॅम झाली आहे. तर स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेची वाहतूकही कोलमडली आहे.
![Konkan Ganeshotsav Special Trains : मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅफिक जॅम, स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेची वाहतूकही कोलमडली traffic jam on Mumbai-Goa highway on the occasion of Ganeshotsav 2024 Konkan Railway schedule collapsed due to special trains Maharashtra Marathi News Konkan Ganeshotsav Special Trains : मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅफिक जॅम, स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेची वाहतूकही कोलमडली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/06/1f1c6c4146f768573e92aeeb29557eee1725603879519923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रत्नागिरी : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी (Ganesh Chaturthi 2024) आता अवघे काही तास उरले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करण्यासाठी लाखो भाविक कोकणच्या दिशेने रवाना होत आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) सलग दुसऱ्या दिवशी ट्रॅफिक जॅम झाल्याचे दिसून येत आहे. स्पेशल ट्रेनमुळे (Special Train) कोकण रेल्वेची (Konkan Railway) वाहतूकही कोलमडली आहे.
स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेची वाहतूकही कोलमडली
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर 310 जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. कोकण रेल्वेमार्गावर काही गणपती स्पेशल गाड्या साडेचार तास उशीराने धावत आहेत. तर नियमित धावणाऱ्या गाड्या दीड तास उशीराने धावत आहेत. यामुळे गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे. कोकणकन्या, तुतारी, सावंतवाडी गणपती स्पेशल, सिंधुदूर्ग एक्सप्रेस या गाड्या उशीरानं धावत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणे, सुकेळी खिंड, लोणेरे परिसरात ट्रॅफिक जॅम झाली आहे. आज सकाळपासून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसमोर विघ्नच विघ्न येत असल्याचे चित्र आहे. मुंबई गोवा हायवेवर रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहने सावकाश चालवण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी मुंबईत महिला पोलिसांची अतिरिक्त कुमक
दरम्यान, गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांना 1 हजार 128 महिला पोलीस अतिरिक्त मिळणार आहे. महिला पोलिसांच्या विशेष तुकडीचं आज नागपुरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आठ महिन्यांचं खडतड प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. दीक्षांत समारंभ आणि पासिंग आऊट परेडच्या माध्यमातून या 1 हजार 128 महिला पोलिसांनी रीतसर पोलीस दलात प्रवेश केला आहे. या सर्व महिला आपल्या कर्तव्यासाठी मुंबईला रवाना झाल्या आहेत. उद्यापासून गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी या महिला पोलीस कर्तव्य बजावणार आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील महिलांची मुंबई पोलिसांच्या या विशेष तुकडीत पोलीस भरतीच्या माध्यमातून निवड झाली होती. प्रिया आगवणे या तुकडीत पहिल्या तर पायल अमिपरा द्वितीय ठरल्या आहेत.
आणखी वाचा
कशेडी घाटात कोकणात जाणाऱ्या दोन बसचा मोठा अपघात; कंटेनरनं अचानक ब्रेक मारल्यामुळे दुर्घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)