एक्स्प्लोर
Advertisement
नगरपालिका निवडणूक : पत्नीसाठी दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
उस्मानाबाद : राज्यातील 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींच्या चुरशीच्या निवडणुकीच्या निकालाआधी अनेक दिग्गज नेत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण काही आमदारांच्या पत्नीच नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बायकोसाठी प्रतिष्ठा पणाला
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना त्यांच्या पत्नी मंदाताई यांच्यासाठी परतूरमध्ये प्रतिष्ठा पणाला लावावी लागली.
साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे यांना कडवी लढत द्यावी लागली.
अमरावतीमधील दर्यापूरचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नीलिमा भारसकळे यांच्या विरोधात त्यांचे दीर सुधाकर भारसाकळे अशी लढत झाली.
माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या पत्नी अनिता नाईक या पुसदमधून आणि विधान परिषद आमदार अमरीश पटेल यांच्या पत्नी जयश्रीबेन यांचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून नगराध्यक्ष होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर नगरपालिकेत अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्या पत्नी अनिता यांच्याविरोधात माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पत्नी पुष्पलता पाटील यांच्यातील लढतीकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष आहे.
संगमनेरमध्ये विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पत्नी दुर्गा या नगराध्यक्ष होणार की नाही, हे निकालानंतर ठरणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या त्या बहिण असल्याने थोरात यांनीही त्यांचा प्रचार केला.
काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नीही जालन्यातून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असल्याने त्यांचीही धाकधूक वाढली आहे.
आईसाठी मंत्री जयकुमार रावलांची प्रतिष्ठा पणाला
रोजगार हमी योजना आणि पर्यटनमंत्री राजकुमार रावल हे अनेक दिवसांपासून प्रचारात व्यस्त आहेत. कारण धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथून त्यांच्या आई नयनकुवरताई रावल नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत.
त्यांच्याविरोधात माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचे भाऊ रवींद्र देशमुख हे उभे आहेत. येथे चुरशीचा सामना झाल्याने रावल यांना प्रचारासाठी कठोर मेहनत घ्यावी लागली. रावल आणि डॉ. हेमंत देशमुख हे दोघेही आमदार होण्यापूर्वी नगराध्यक्षच होते.
राज्यातील भाऊबंदकीचा निकाल
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन भाऊ आमनेसामने आहेत. भाजपचे आमदार संजय धोटे यांचे भाऊ सतीश धोटे आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसने अरुण धोटे यांना प्रतिस्पर्धी म्हणून उभे केले आहे.
बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबीयात भाऊबंदकीने डोकं वर काढलं आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप यांनी चुलत्यांच्या सत्तास्थानाला आव्हान दिलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते डॉ. सतीश पाटील यांनाही त्यांचा पुतण्या कुणाल पाटील यांनी भाजपकडून आव्हान दिलं आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप याने शिवसेनेत प्रवेश करून रोह्यात काकालाच आव्हान दिलं.
परळीतील निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या बहिण भावात चुरशीची लढत आहे.
नवीन पिढीचा राजकीय निकाल
नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण्यांची नवीन पिढीचंही राजकीय भवितव्य ठरणार आहे. दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा या श्रीरामपूरमधून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत.
तासगावमध्ये दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर हे दोघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील राहत्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी निवडणुकीची जबाबदारी सांभाळली.
करमाळ्यात माजी आमदार जयंतराव जगताप यांचे पुत्र वैभवराजे जगताप हे नगराध्यक्षापदासाठी रिंगणात होते.
बार्शीत माजी मंत्री दिलीप सोपल यांचे पुतणे योगेश हे नगरसेवक होणार की नाही, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे बंधू संजय यांचाही मेहकरमधून नगरसेवकपदाचा निकाल लागणार आहे. भुसावळमधे माजी आमदार संतोष चौधरी यांचा मुलगा सचिन नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे.
जिल्हानिहाय प्रतिष्ठेच्या लढती
परतूर (जालना) - मंदाताई लोणीकर : पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पत्नी
जालना : काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नीही जालन्यातून नगराध्यक्षपदासाठी
अमरावती : निलीमा भारसाकळे - आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी
अंमळनेर (जळगाव) : अनिता चौधरी - अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्या पत्नी
अंमळनेर (जळगाव) : पुष्पलता पाटील - माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पत्नी
भुसावळ (जळगाव) : सचिन चौधरी - माजी आमदार संतोष चौधरी यांचा मुलगा
धुळे : नयनकुवरताई रावल - रोजगार हमी योजना आणि पर्यटनमंत्री राजकुमार रावल यांच्या मातोश्री
धुळे : रवींद्र देशमुख - माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचे भाऊ
पुसद (धुळे) : अनिता नाईक - माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या पत्नी
शिरपूर (धुळे) : जयश्रीबेन पटेल - विधान परिषद आमदार अमरीश पटेल यांच्या पत्नी
बुलडाणा : संजय जाधव - शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे बंधू
करमाळा (सोलापूर) : वैभवराजे जगताप - माजी आमदार जयंतराव जगताप यांचे पुत्र
बार्शी (सोलापूर) : योगेश सोपल - माजी मंत्री दिलीप सोपल यांचे पुतणे
संगमनेर (अहमदनगर) : दुर्गा तांबे - विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पत्नी आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बहिण
राहाता (अहमदनगर) : सुजय विखे - राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव
श्रीरामपूर (अहमदनगर) : अनुराधा आदिक - दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांच्या कन्या
परळी (बीड) : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
बीड : संदीप क्षीरसागर - माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे
सातारा : वेदांतिकाराजे भोसले - आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी
तासगाव (सांगली) : स्मिता पाटील - दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या कन्या
तासगाव (सांगली) : प्रभाकर पाटील - भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र
रोहा (रायगड) : संदीप कटकरेंचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आव्हान
राजुरा (चंद्रपूर) : सतीश धोटे - भाजपचे आमदार संजय धोटे यांचे भाऊ
संबंधित बातम्या :
147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतींचा निकाल काही तासांवर
वर्धा : राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गाडीतून साडे तीन लाखांची रोकड जप्त
147 नगरपालिका, 18 नगर पंचायतींत सरासरी 60 टक्के मतदान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement