Top Headlines Today : जाणून घ्या आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी
National News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
राजद्रोहाचे खटले स्थगित करता येतील का यावर केंद्र न्यायालयात मत मांडणार
राजद्रोहाच्या कायद्यावर म्हणजे कलम 124 अ वर पुनर्विचार करेपर्यंत या संबंधिच्या प्रलंबित सर्व खटल्यावरील कारवाई स्थगित करणार का हे स्पष्ट करा असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले आहेत. त्यावर केंद्र सरकार आज न्यायालयात आपलं मत मांडणार आहे. या संबंधित आज सकाळी 10.30 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर करुन निरपराधांना त्रास दिला जातो अशी अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे. केंद्रांने आता या कायद्यावर पुनर्विचार करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे. पण हा कायदा सुमारे शंभर वर्षांपासूनचा म्हणजे ब्रिटिशकालीन असल्याने यावर पुनर्विचार करण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला वेळ द्यावा अशी विनंती सॉलिसिटर जनरल यांनी केली आहे.
राज्यात लवकरच वाजणार महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल
ओबीसी प्रश्नावर सुप्रिम कोर्टाने दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दोन टप्प्यात महानगर पालिका निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक
आज दुपारी 4 वाजता मंत्रालयात कॅबिनेटची बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत ओबीसीच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश सरकारला कोर्टाने फटकारल्यानंतर आणि येत्या काही दिवसात कोर्टात सादर करायचे उत्तर यावर आज चर्चा होऊ शकते. येत्या काही दिवसात राज्य निवडणुक आयोगाला निवडणुकीचा कार्यक्रम सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.
राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या खासदार बृजभूषण सिंह यांची आज सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्याविरोधात भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांची सभा आजही होणार आहे. खासदार बृजभूषण सिंह बहराईच येथे सकाळी 11 वाजता एका जनसभेला संबोधित करणार आहेत. तसेच काही नेते आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
एनआयए चौकशी अपडेट
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मुंबईतील 29 ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने छापे मारलेत. मुंबईतील नागपाडा, भेंडीबाजार, सांताक्रुझ, गोरेगाव, बोरीवली आणि मुंब्रा परिसरात सकाळपासून ही छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर येतेय. डी कंपनीशी संबधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शूटर्सच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आलेत. एनआयएने फेब्रुवारीत दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयएकडून सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई सुरु आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल चौकशीसाठी बोलवलेल्यांपैकी काही लोकांना आज पुन्हा सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलवलं आहे. मंगळवारी सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवून चौकशी करण्यात आली. शिवाय यातल्या प्रत्येकाचे दाऊद कनेक्शन तपासले जात आहेत. साधारणपणे 10 तासांच्या चौकशी नंतर गुड्डू पठाण, अजय गोसालिया, सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट यांना सोडण्यात आलं.
हिंसाचार करणाऱ्यांना थेट गोळ्या घाला, श्रीलंकेच्या लष्कराला आदेश
श्रीलंकेत राष्ट्रव्यापी कर्फ्युनंतरही जोरदार आंदोलन सुरुच आहे. दंगलग्रस्तांना रोखण्यासाठी गोळी मारण्याचे आदेश देण्यात आलेत. दुसरीकडे महिंद्रा राजपक्षे यांच्या अटकेची मागणी तीव्र होत आहे. आतापर्यंत श्रीलंकेतील हिंसेमध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय. तर 200 हून अधिक नागरिक जखमी झालेत. श्रीलंकेमध्ये परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली असून या देशाचा यादवीकडे प्रवास सुरू आहे. श्रीलंकेमध्ये होत असलेला हिंसाचार पाहता संरक्षण मंत्रालयाने लष्कराला गोळीबाराचा आदेश दिला आहे. जे नागरिक सरकारी मालमत्तेचं नुकसान करत असतील किंवा जे नागरिक हिंसाचारामध्ये भाग घेत असतील त्यांना थेट गोळ्या घाला असा आदेश श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने लष्कराला दिला आहे.
सयाजी शिंदे यांच्याकडून परभणीत 90 मोठ्या वृक्षांचे पुन:रोपण
सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त उपक्रमातून परभणीतील देवगाव फाटा ते जिंतुर महामार्गावर 90 मोठ्या वृक्षांचे पुन:रोपण केलं जाणार आहे. राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष पुन:रोपण करण्याची ही पहिलीच वेळ असावी. हा कार्यक्रम सकाळी 9 वाजता होणार आहे.
दिल्लीकरांसमोर राजस्थानचे आव्हान
आज नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात आयपीएलमधील (IPL 2022) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. आजचा हा सामना दोन्ही संघाना पुढील फेरीचं तिकीट मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.