तुरीची 10 हजारांच्या 'विक्रमी' भावाकडे वाटचाल!
कधी नव्हे ते तूर उत्पादक शेतकऱ्यांना 'सुगी'चे दिवस आल्याचं सध्याचं चित्रं आहे. मात्र, बाजारातील आवक वाढल्यानंतर महिनाभरात भाव स्थिर होण्याची शक्यता आहे. सध्या तुरीला सरासरी 8500 रुपये भाव मिळत असून लवकरचं हा भाव 10 हजार रुपये गाठण्याची शक्यता आहे.
अकोला : राज्यातील यावर्षीच्या तुरीच्या हंगामाची सुरूवातच अगदी दणक्यात झाली आहे. दरवर्षी तुरीचा हंगाम गाजतो तो तूरीच्या पडलेल्या भावांमूळे. मात्र, यावर्षी कधी नव्हे ते तूर उत्पादक शेतकऱ्यांना 'सुगी'चे दिवस आल्याचं सध्याचं चित्रं आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत काल (मंगळवारी) तुरीला या हंगामातील सर्वाधिक 8,875 रूपये इतका भाव मिळाला आहे. राज्यातील इतर बाजार समित्यांतही तुरीला सरासरी 8500 रूपये इतका भाव मिळतो आहे. तुरीच्या बाजार भावातील हीच तेजी कायम राहिल्यास आठवडाभरात हे भाव सहजपणे दहा हजारांचा टप्पा गाठू शकतो.
यावर्षी कोरोनामुळे शेतकरी अगदी देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील शेतकरी यावर्षी कोरोनामुळे पडलेले बाजारभाव आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, मुग, संत्रा, भाजीपाला अशी हातून गेलेली पिके यामुळे निराशेच्या गर्तेत सापडला आहे. या कठीण परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना 'आशेचा किरण' दिसतो आहे तो तुरीच्या पिकात. कारण, दरवर्षी पडणारे तुरीचे भाव मात्र गेल्या अनेक वर्षांत आता पहिल्यांदाच वधारले आहेत. यावर्षी तुरीला 5600 रूपये इतका हमीभाव आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना कसा तरी हमीभावाइतका मोबदला मिळतोय. मात्र, यावर्षी तुरीला खऱ्या अर्थाने सुगी आली आहे. सध्या तुरीला सरासरी 8500 इतका भाव मिळतो आहे.
मात्र, तुरीच्या भावातील ही तेजी तात्पूरती ठरण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ञ व्यक्त करीत आहेत. पुढच्या महिनाभरात देशभरातील नवी तूर बाजारात येईल. राज्यातील बाजारात कर्नाटक आणि राज्यातील तूर आल्यानंतर हे भाव पडण्याची मोठी शक्यता आहे. तुरीच्या सध्या वाढलेल्या भावाचा परिणाम तुर डाळीच्या भावावर होणार आहे. ऐन दिवाळीच्या काळात तूर डाळीचे भाव यामूळे वाढणार आहेत.
मागील सहा वर्षांतील तुरीचे हमीभाव
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाच्या पिकांचे हमीभाव वाढविण्याचे ठोस आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या सहा वर्षांत तुरीचा हमीभाव फक्त 1500 ते 2000 रूपयांनी वाढला. राज्यात गेल्या पाच वर्षांत तुरीचा हंगाम गाजला तो मिळालेल्या कमी भावामुळे आणि खरेदीत झालेल्या गोंधळ आणि भ्रष्टाचारामुळे. दरवर्षी शेतकऱ्यांना जेमतेम हमीभावाच्या आसपास भाव मिळत असल्याने तूर उत्पादक शेतकरी बेचैन होते. यावर्षी मात्र परिस्थिती काहीशी बदलली आहे.
वर्ष भाव (हजार) 2015-16 : 4625 2016-17 : 5050 2017-18 : 5450 2018-19 : 5675 2019-20 : 5800 2020-21 : 6000काय आहेत भाववाढीची कारणे?
यावर्षी तुरीच्या लागवड क्षेत्राच्या तुलनेत तुरीची मागणी सध्याच्या बाजारात अधिक आहे. सध्याच्या भाववाढीचं हे सर्वात मोठं कारण आहे. सोबतच राज्याच्या तूर बाजारपेठेत राज्यातील तुरीची आवक नोव्हेंबरच्या शेवटपासून व्हायला सुरूवात होते. सोबतच राज्याच्या तूर बाजारात शेजारच्या कर्नाटक राज्यातील तूर यायला या महिन्याचा शेवट उजाडेल. या सर्व कारणामुळे राज्यात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने तुरीचे भाव वधारले आहेत.
तूर उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन तर डाळीचे दर गगनाला भिडणार!
तूर डाळीचे भाव वाढणार?
तूर हा तूर डाळीसाठीचा कच्चा माल आहे. त्यामुळे तुरीचे भाव वाढले की आपोआपच तुरडाळीचे भाव वाढतात. सध्या तुरीला 8500 रूपये इतका भाव आहे. तो पुढच्या काही दिवसांत दहा हजारांवर जाण्याची शक्यता आहे. दालमील उद्योगातील डाळ बनवितांना लागणारा प्रक्रिया खर्च पकडला तर पुढच्या काही दिवसांत तूर डाळ 150 ते 180 रूपये प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत ही परिस्थिती सुधारली नाही तर ऐन दिवाळीत तुरडाळीचे भाव भडकण्याची चिन्हे आहेत. मात्र, भाववाढीची ही परिस्थिती दिवाळीपर्यंत निवळेल असं क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांना वाटतंय.
तर तुरीचे भाव पडणार
राज्यात 'नाफेड'कडे मागच्या दोन वर्षांतील तुरीचा साठा तसाच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा दोन वर्षांचा साठा सरकारने खुल्या बाजारात लिलावासाठी काढल्यास बाजारातील तुरीचा आवक वाढून पडेल. सरकार तुरडाळीचे भाव वाढल्याच्या परिस्थितीत असा निर्णय घेऊ शकते. यासोबतच केंद्र सरकारने ऐनवेळी बाहेर देशांतून तुरीची आयात करण्याचा निर्णय घेतल्यासही तुरीचे भाव कोसळू शकतात. भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणात मोझांबिक या देशाकडून तुरीची आयात करीत असतो. त्यामुळे सरकारच्या निर्णयावरच तुरीचे भाव वाढल्याचा शेतकऱ्यांचा आनंद अवलंबून आहे.
या भाववाढीचा राज्यातील शेतकऱ्यांना सध्या कितपत फायदा?
सध्या तुरीला विक्रमी भाव मिळत असले तरी याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार का?, हाच खरा प्रश्न आहे. कारण, राज्यातील तूर नोव्हेंबरच्या शेवटी बाजारात येते. त्यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना या वाढलेल्या भावाचा लाभ होण्याची शक्यता कमीच आहे. सध्या मागच्या वर्षीची तूर न विकलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सध्याच्या परिस्थितीचा फायदा होऊ शकतो. यावर्षी शेतकऱ्यांची तूर बाजारात येईपर्यंत सध्याच्या भावात दोन ते अडीच हजारांची घट होऊ शकते असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
अकोला आणि लातूर राज्यातील तूरीची मोठी बाजारपेठ :
राज्यातील अकोला आणि लातूर ही शहरं तुरीची मोठी बाजारपेठ आहेत. या दोन शहरातील बाजारांतून दरवर्षी तूरीचे दर निश्चितच होतात. राज्यातील तूर उत्पादक शेतकरी आणि डाळ व्यापारी या दोन शहरांतील बाजारपेठेवर लक्ष ठेवून असतात. अकोला शहर तर दालमिलचं शहर म्हणून ओळखलं जातं. अकोल्यातील डाळ संपुर्ण देशात नावाजलेली आहे. येथील एमआयडीसीतील साठ टक्के उद्योग हे डाळीवर आधारीत आहेत. अकोला एमआयडीसीत सध्या 250 वर छोट्या-मोठ्या दालमिल्स सुरू आहेत. येथील डाळ उद्योगाची उलाढाल ही हजारो कोटींमध्ये आहेत.
वर्ष अकोला वाशिम 2018-19 49,127 5189 2019-20 100,246 58267
तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस, यंदा हमीभावापेक्षाही जास्त दर