(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार , जाणून घ्या दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Todays Headline : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता नांदेडच्या देगलूरमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं आगमन होईल. सिल्लोडमध्ये आज आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंची एकाचवेळी सभा होणार आहे. याबरोबरच मोदी सरकारने दिलेल्या दहा टक्के आर्थिक आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय येणार आहे. आदित्य ठाकरे संध्याकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत शेतकऱ्यांशी संवाद साधतील. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार
आज राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता नांदेडच्या देगलूरमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं आगमन होईल. तिथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल. तिथेच राहुल गांधी यांचं छोटेखानी भाषण होईल.
सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंची सभा
सिल्लोडमध्ये आज आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंची एकाचवेळी सभा होणार आहे. आदित्य ठाकरे संध्याकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तर श्रीकांत शिंदेंची सायंकाळी चार वाजता सिल्लोडच्या जिल्हा परिषद ग्राउंडवर सभा होणार आहे.
आदित्य ठाकरेंचा आजपासून शेतकरी संवाद
आदित्य ठाकरे अकोला, बुलडाणा आणि औरंगाबादला शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात निकाल
मोदी सरकारने दिलेल्या दहा टक्के आर्थिक आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने दीर्घ सुनावणी केल्यानंतर हा निकाल राखून ठेवला होता. आज 103 वी घटनादुरुस्ती वैध की अवैध याचा निर्णय होणार आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या निवृत्तीआधी महत्त्वाचा निर्णय आज येणार आहे.
ठाकरे गटाचे आंदोलन
गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. याविरोधात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानक जवळ सकाळी दहा वाजता निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
चित्रा वाघ यांचा महाराष्ट्र दौरा
भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चित्रा वाघ यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. बुलडाण्याच्या सिंदखेडराजा येथे जिजाऊंना अभिवादन करुन आज या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. तसेच त्या महिला मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी दहा वाजता चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद होणार आहे.
अंधेरी येथे भाजपची सभा
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या वतीने जागर मुंबईचा या यात्रेची सुरुवात केली आहे. या यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या भागात भाजपा मोर्चा बांधणी करत आहे. आज अंधेरी येथे भाजपची दुसरी सभा असणार आहे.
राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद
पुणे राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची पुण्यातील कौन्सिल हॉलला दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
स्वाभिमानीचा पुण्यात मोर्चा
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टींच्या उपस्थितीत पुण्यातील साखर आयुक्त यांचे कार्यालय असलेल्या साखर संकुलवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचं अन्नत्याग आंदोलन
वंचित बहुजन आघाडीचं आज अमरावती अन्नत्याग आंदोलन होणार आहे. शहरातील बाबा हॉटेल चौक ते सिंधी चौक पर्यंत रस्त्याचं नूतनीकरण करण्यासाठी वारंवार निवेदन आणि अनेकवेळा आंदोलन करूनही महानगरपालिका प्रशाससाने अजूनही लक्ष दिले नाही. स्थानिक युवकांनी दिवाळीच्या दिवशी रस्त्यात दिवे लावून लक्ष वेधले तरीही महानगरपालिकेला जाग आली नाही. त्यामुळे अखेर आता वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून महानगरपालिकेचं लक्ष वेधून घेणार आहेत.