Todays Headline 4th october : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Todays Deadline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
अनिल देखमुखांच्या जामीन अर्जावर सुनावणी
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जेल की बेल? याचा निर्णय आज उच्च न्यायालयात होणार आहे. गेल्या आठवड्यात राखून ठेवलेला निकाल आज दुपारी अडीच वाजता जाहीर होणार आहे.
कोल्हापूर ते मुंबई विमान सेवेचा आज शुभारंभ
कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा आजपासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. तर चंद्रकांत पाटील उपस्थित रहाणार आहेत. संजय घोडवत ग्रुपची ही विमानसेवा असणार आहे.
मुंबईत आज मंत्रीमंडळाची बैठक
आज राज्य मंत्रीमंडळाची दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे.
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित नंदूरबार दौऱ्यावर
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आजपासून दोन दिवस नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या काळात आदिवासी विकास विभागातील आश्रम शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विविध बैठकांचं आयोजन करण्यात आले आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर
सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्त झाल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सोलापुरात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडेल.
हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल वी आर चौधरी यांची पत्रकार परिषद
हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल वी आर चौधरी यांची सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. त्या आज महिला उद्योजकांसाठी गुजरात विद्यापीठाच्या स्टार्ट-अप व्यासपीठ 'हारस्टार्ट' लाँच करणार आहेत आणि गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद येथे शिक्षण आणि आदिवासी विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील टी २० मालिकेतल्या तिसरा आणि शेवटा सामना
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या टी २० मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्याला सुरूवात होणार आहे. मालिकेतले पहिले दोन सामने खिशात घातल मालिका भारताने जिंकली आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आलीये. संध्याकाळी ७ वाजता, होळकर स्टेडिअमवर सामना होणार आहे.
महिला आशिया चषक स्पर्धेतील भारत - UAE मध्ये लढत
महिला आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा पुढील सामना UAE विरुद्ध होणार आहे. याआधी सोमवारी भारताने मलेशियाचा 30 धावांनी पराभव केला.