Todays Headline 30th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
शिंदे सरकारला महिना पूर्ण
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी 29 जूनला शपथ घेतली होती. एक महिना उलटूनही नव्या सरकारचं मंत्रीमंडळ अस्तित्वात आलेलं नाही. महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती, अनेक निर्णय रद्द, झपाट्यानं घेतलेले काही नवे निर्णय यामुळे हे सरकार चर्चेत राहिलंय.
अर्जुन खोतकर आज भूमिका मांडणार
शिवसेना नेते अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार हे जवळपास निश्चित आहे. पण, आज ते याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करु शकतात. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात अर्जुन खोतकर यांचा प्रवेश होणार अशी चर्चा आहे. मात्र याच चर्चाना उद्या पूर्णविराम मिळू शकतो. आज जालन्यात दाखल झालेले अर्जुन खोतकर यांनी आपण पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांची ही पत्रकार परिषद होणार आहे. ज्यात ते आपला अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दौरा करणार आहेत. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच 30 जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मालेगावचा उल्लेख जि.(जिल्हा) मालेगाव असा करण्यात आलाय. मुख्यमंत्री यांच्यां पहिल्याच मालेगाव दौऱ्यात मालेगाव जिल्हा करण्यासंदर्भात प्रस्तवावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री आज दौंडाई (धुळे) दौऱ्यावर..विविध कार्यक्रमांना उपस्थिती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दौंडाई (धुळे) दौऱ्यावर आहेत.
स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमरावती व भोगावती नदीच्या संगमावर 75 फूट उंच असलेल्या ध्वज स्तंभाचे लोकार्पण होणार आहे. तसेच विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहे