Todays Headline 19th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत
मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुख्यमंत्री दिल्लीत, शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवरची फूट आजच होण्याची शक्यता
शिवसेनेतील 12 खासदारांना घेऊन आज मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे नेमले जाणार तर प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार. लोकसभा अध्यक्षांना आज याबाबतच पत्र सोपवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे विनायक राऊत हेच गटनेते आणि राजन विचारे हे अधिकृत व्हीप असा दावा करत शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलंय. मुख्यमंत्री काल रात्री दिल्लीत दाखल झालेत.
विदर्भात पावसाचं थैमान..आजही मुसळधार पावसाचा अंदाज
वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा आणि चंद्रपुरातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
महागाईविरोधात काँग्रेसचं संसद भवन परिसरात आंदोलन
संसदेचं पावसाळी अधिवेशनचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनात महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेससह विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसकडून संसद भवन परिसरातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येणार आहे.
नुपूर शर्मांच्या याचिकेवर सुनावणी
पैगंबरांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात दिल्ली, महाराष्ट्र, प. बंगाल आणि तेलंगणा येथे नऊ गुन्हे दाखल आहेत. एफआयआर दिल्लीला ट्रांसफर करण्याबाबत नुपूर शर्मांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दुपारच्या सत्रात सुनावणी होईल.
मार्गारेट अल्वा आज अर्ज भरणार
विरोधकांच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. जगदीप धनकट यांनी कालच एनडीएचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय. उपराष्ट्रपती पदासाठी 6 ऑगस्टला मतदान आणि मतमोजणी होणार आहे. 11 ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती पदभार स्वीकारतील.
प्रसिद्ध गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांचं निधन
भूपिंदर सिंह यांचं रात्री निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक आजारांचा सामना करत होते. त्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. मुंबईतील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री उशीरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
श्रीलंका संकटावर सर्वपक्षीय बैठक
केंद्र सरकारने श्रीलंका संकटावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि एस जयशंकर हे श्रीलंकेतील सध्य स्थितीबाबत माहिती देतील.
श्रीलंकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार
श्रीलंकेत 20 जुलै रोजी होणा-या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.