Todays Headline 19th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
रायगडमध्ये सापडलेल्या बोटीसंबंधी एटीएसची टीम तपास करणार
रायगडमध्ये सापडलेल्या बोट प्रकरणाचा तपास एटीएसची टीम करणार आहे. गुरुवारी सकाळी बोटीमध्ये एके-47 रायफल्स सापडल्यामुळे खळबळ माजली होती. त्यानंतर मुंबई, पुण्यासह राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल गुरुवारी सायंकाळी बोटीच्या ठिकाणी पोहचले होते. त्यांनी सर्व पाहणी केली. बोटीमध्ये मिळालेल्या साहित्याचीही त्यांनी पाहणी केली. तसेच पुढील तपासाची दिशा काय असेल याची चाचपणी केली.
आज राज्यभर दहीहंडीचा उत्साह
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा सण साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा राज्यभरात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यामध्ये खासकरून मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी धुमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे.
असा साजरा होणार दहीहंडीचा सण
टेंभीनाका दहीहंडी
ठाण्यातील टेंभीनाका या ठिकाणी आज दुपारी 12 वाजता दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीचा नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फोडण्यात येणार आहे. तमन्ना भाटिया, श्रद्धा कपूर, आणि जॅकी श्रॉफ या बॉलिवूड कलाकारांच्या सोबत भार्गवी चिरमुले, अवधूत गुप्ते, हार्दिक जोशी, स्मिता सरोदे, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, पूर्णिमा तळवलकर, चेतन वर्दने बॉईज 3 ची टीम, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, विदुला चौघुले हे कलाकार या कार्यक्रमाचे खास आकर्षण असतील.
दादर आयडीयल दहिहंडी
यंदा ही दहीहंडी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या माध्यमातून सकाळी 9 ते 10 या दरम्यान आयोजित करण्यात येईल.
दादर शिवसेना भवनासमोर युवा सेनेकडून निष्ठा दहीहंडी
युवासेना कार्यकारिणीकडून दादरच्या शिवसेना भवनासमोर दहीहंडीचे आयोजन करण्यात आलं असून त्यातून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. या माध्यमातून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गीत-संगीत-भगव्याचा जल्लोष आणि मान्यवरांची उपस्थिती या दहीहंडी उत्सवाचं आकर्षण असेल.
ठाण्यात राजन विचारे यांची दहीहंडी
शिवसेना खासदार राजन विचारे यांनी ठाण्यामध्ये दहीहंडीचे आयोजन केलं आहे. त्यांच्या या कार्यक्रमाकडे अनेकांचे लक्ष लागलं असून या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.