Todays Headline 19 october : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
आज काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष
मल्लिकार्जुन खर्गे किंवा शशी थरुर यांच्यापैकी काँग्रेसचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याचा निर्णय आज होणार आहे. आज दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयात सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी होईल. तब्बल 24 वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल कधी वाजणार? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
राज्य सरकारने केलेले प्रभाग रचनेतले बदल, थेट नगराध्यक्षपदाची निवड या मुद्द्यांना कोर्टात आव्हान दिले गेले आहे. त्यामुळे याचा निर्णय झाल्यानंतरच महापालिका निवडणुका कधी होणार याची स्पष्टता येणार आहे. या दृष्टीने आजची सुनावणी महत्त्वाची असेल. जुलै महिन्यातच ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. पण 92 नगरपरिषदांसाठी तो मार्ग उपलब्ध नसल्याने राज्य सरकार कोर्टात गेले आहे आणि त्यामुळे सर्वच निवडणुका रखडल्या आहेत.
मुंबईसह राज्यातल्या अनेक महापालिकांवर सध्या प्रशासकाची नियुक्ती आहे. सहा महिन्यांची मुदतही ओलांडून गेली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या प्राथमिकतेबद्दल आज सुप्रीम कोर्टात काही युक्तिवाद टिप्पणी होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल.
राज्य सरकारविरोधात आज नवी मुंबईत शिवसेनेचा मोर्चा
राज्य सरकारविरोधात आज शिवसेनेचे खासदार, आमदार, पदाधिकारी, शिक्षकसेना पदाधिकारी, भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, कामगार सेनेचे पदाधिकारी, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगसेवक, सरपंच, ग्रा.पं.सदस्य शिवसेना संलग्न संघटना सीबीडी बेलापूर ते नवी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेविरोधातील याचिकेवर आज सुनावणी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात हायकोर्टात दाखल याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. गौरी भिडे यांनी काही महिन्यांपूर्वी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. डिफेन्स एक्सपो 22 चं उद्घाटन करणार आहेत. पतंप्रधान जुनागडमध्ये 3580 कोटी रूपयांच्या योजनाचं उद्घाटन करणार आहेत. तर राजकोटमध्ये 5860 कोटींच्या योजनांचं लोकार्पण करणार आहेत. सकाळी 9.45 वाजता मोदी डिफेन्स एक्सपोचं उद्घाटन करणार आहेत.