प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी वाहक आणि चालक कलाकारांच्या भूमिकेत
एसटी बंदमुळे एसटीचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झाल्याच पाहायला मिळत आहे.
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस टी बंद राहिल्याने एसटीला मोठं आर्थिक नुकसान सोसावे लागलं आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकलेले नाहीत. आता एसटी सुरू झाली असली तरी अद्यापही हवा तो प्रतिसाद प्रवाशांचा नसल्याने प्रवाशांनी एसटीने प्रवास करावा यासाठी शक्कल लढवली आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी एसटीच्या सुरक्षित वाहतुकीचं महत्व सांगणारी गाण्याची क्लिप व्हायरल करून प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे
महामंडळाची एस टी बस म्हणजे ग्रामीण भागाची जीवन वाहिनी मानली जाते. मात्र कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊनमुळे एस टी बंद ठेवण्यात आली. एसटीवर आपला चरितार्थ चालवणाऱ्या अनेकांच्या रोजी रोटीचा प्रश्न त्यातून निर्माण झाला, त्याला एसटीचे कर्मचारीही अपवाद राहिलेले नाहीत. एसटी बंदमुळे एसटीचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झाल्याच पाहायला मिळत आहे. एसटी चालली ,तिची चाक गावगाव फिरली तरच आपल्या रोजी रोटीचा प्रश्न सुटणार आहे हे लक्षात आल्यावर एसटीचे कर्मचारी आता एसटीच्या मदतीसाठी धावून आल्याचे पाहयला मिळत आहे.
नुकताच एसटीचा प्रवास आता सुरू करण्यात आला आहे. मात्र कोरोनाचा सावट असल्याने अनेक जण अजूनही एसटीने प्रवास करणे टाळत आहेत,त्याचा परिणाम म्हणून एसटीचा आर्थिक गाडा अद्यापही सुरळीत झाला नसल्याने अनेक कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. नियमित वेतन मिळण्यासाठी एसटी ला प्रवासी मिळणे आवश्यक आहे. एसटीचा प्रवास हा सुरक्षित आहे हे पटवून देण्यासाठी आणि प्रवाशांनी एसटीने प्रवास करावा यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी एसटीच्या वाहक. चालक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गाण्याची चित्रफीत बनवली आहे. चल एसटीने जाऊ असे हे गाणे असून ती सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. त्यांच्या या प्रयत्नाला प्रवाशांनी ही प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या :