तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा, तीन हिरो पाहिजेत : अशोक चव्हाण
संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे. संविधानाच्या उद्देशिकेपलिकडे जाता येणार नाही आणि असं झालं तर सरकारमधून बाहेर पडायचं, असं सोनिया गांधींनी सत्ता स्थापनेच्या वेळी सांगितलं होतं, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं.
नांदेड : तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत, असं वक्तव्य राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. तसंच संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, हे शिवसेनेकडून लिहून घ्या, असं सोनिया गांधींनी सत्ता स्थापनेच्या वेळी सांगितलं होतं, असंही अशोक चव्हाण म्हणाले. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अशोक चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमाला अभिनेते सचिन खेडेकरही उपस्थित होते.
अशोक चव्हाण म्हणाले की, "तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा. सुदैवाने आमचा सिनेमा सध्या बरा चालला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे, कुणालाही वाटलं नाही की आम्ही एकत्र येऊ. पण हल्ली मल्टिस्टारर सिनेमाचा जमाना आहे. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत."
सत्ता स्थापनेपूर्वी सोनिया गांधींच्या कडक सूचना : अशोक चव्हाण
अशोक चव्हाण म्हणाले की, "तीन पक्षांचं सरकार, तीन विचाराचं सरकार चालणार कसं असा प्रश्न आम्हाला विचारला जात होता. दिल्लीतल्या आमच्या नेत्यांना भेटलो, ते म्हणाले, आम्ही बिलकुल परवानगी देणार नाही. रोज भांडणं होतील, रोज प्रश्न निर्माण होतील. सरकार चालवणार कसं? मी मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षांचं सरकार चालवलं आहे. परंतु आमच्या नेत्या सोनिया गांधींनी सांगितलं पहिलं हे लिहून घ्या की संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे. संविधानाच्या उद्देशिकेपलिकडे जाता येणार नाही आणि असं झालं तर सरकारच्या बाहेर पडायचं. एवढ्या कडक सूचना आम्हाला सरकार बनवण्यापूर्वी देण्यात आल्या. जे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं, ते म्हणाले, काही हरकत नाही आणि त्याच्याबाहेर जाणार नाही. घटना हीच शिवधार्य मानून, घटनेच्या चौकटीत राहून सरकार चालणार आहे, अशाप्रकारची भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली."